मुंबई - आपल्या सहज सुंदर अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारा अभिनेता इरफान खान यांचा आज दुसरा स्मृतिदिन आहे. २९ एप्रिल २०२० मध्ये मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला होता. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्युमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणी खाली वावरत होते.
इरफानच्या निधनाच्या एक आठवडा अगोदर त्यांना मातृशोक झाला होता. त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊन मुळे इरफान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. हे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आपल्या आईच अंत्यदर्शन घेतलं होतं.
इरफान खान दोन वर्षे न्यूरो इंडोक्राईन ट्युमर या आजाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर लंडनमध्ये इलाज सुरू होता. यातून ते बरे झाले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट स्वीकारला होता. याचे काही शूटींगही पार पडले होते. हा चित्रपट पूर्ण होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतानाच त्यांनी आजारातून उठल्यानंतर कंबर कसली आणि लंडनमध्ये पुढील शूटींगला सुरूवात केली. त्यानंतरच ते मायदेशी परतले होते.
गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या इरफान यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ठरल्या प्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.