हैदराबाद- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी आगामी २०२३ च्या विश्वचषकाचे 'गोल्डन तिकीट' सुपरस्टार रजनीकांत यांना दिलंय. येत्या ५ ऑक्टोबर पासून भारतात विष्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझिलंड संघादरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. अंतिम सामनाही याच मैदानावर १९ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
सुपरस्टार रजनीकांतच्या आधी बीसीसीआयने मेगास्टार अमिताभ बच्चन आणि क्रिकेट दिग्गज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट दिलं होतं. रजनीकांत उर्फ थलैवा यांना खास व्हीआयपी स्टँडवरून सर्व सामने विनामूल्य पाहता येणार आहेत. त्याची उपस्थित प्रेक्षकांसाठी खूप उत्साहवर्धक असेल हे वेगळं सांगायला नको.
आयसीसी विश्वचषक २०२३ साठी रजनीकांतला गोल्डन तिकीट बहाल केल्याचा फोटो बीसीसीआयनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी हे तिकीट रजनीकंत यांच्याकडं सुपूर्त केलं. रजनीकांतनी सामन्यांना हजेरी लावल्यामुळे त्याच्या उपस्थितीचा आम्हाला आनंद वाटेल असे फोटोसह लिहिण्यात आलंय.
गुजरातमधील अहमदाबाद येथे नव्यानं बांधण्यात आलेलं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान आहे. या स्टेडियमवर पहिल्यांदाच विश्वचषकाचा सामना खेळवला जाणारेय. पूर्वी सरदार पटेल स्टेडियम असं नाव असलेलं हे मैदान नुतणीकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नामकरण करण्यात आलंय. सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करुन या मैदानाची निर्मिती करण्यात आलीय. १ लाख १० हजार बैठक क्षमता असलेलं हे भव्य मैदान आता विश्वचषकाच्या उद्घाटनसाठी सज्ज झालं असून इतर सामन्यांसह याच मैदानावर यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामनाही पार पडेल.