मुंबई -अभिनेत्री दिया मिर्झाची एक अनोखी ओळख आहे. तिचा अभिनय जसा एक पैलू आहे तसेच इतरही काही पैलू आहेत. वास्तविक एक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकलेली युवती ‘हम तुम्हारे दिल में रहते हैं‘ मधून चित्रपटसृष्टीत दाखल झाली ती म्हणजे दिया मिर्झा. त्यानंतर बऱ्याच चित्रपटांचा भाग बनल्यानंतर ती थोडाकाळ गायब झाली. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड‘ मध्ये ती एका महत्वाच्या भूमिकेत दिसली. लॉकडाऊनच्या काळातील चित्रपटाची गोष्ट असून संपूर्ण चित्रपट कृष्ण धवल आहे. आताच्या रंगीबेरंगी चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या कलाप्रेमींना हा सुखद धक्का होता. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून नुकताच आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी अभिनेत्री दिया मिर्झा सोबत संवाद साधला.
‘भीड‘ ला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट करतानाच ‘अनुभव‘ काय होता?
दिया -‘भीड‘ करतानाच ‘अनुभव‘ नक्कीच सुखद होता. अर्थातच चित्रपटामध्ये सिरीयस गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा याने मला जेव्हा मला कथा ऐकविली तेव्हाच मला ती भिडली होती. त्यानंतर तो चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्ये करणार असल्याचे सांगितल्यावर मी थोडी हबकलेच होते. परंतु त्याने त्यामागची भूमिका सांगितली. लॉकडाऊनमध्ये अनेकांची आयुष्ये उध्वस्त झाली, होरपळली गेली. त्यांच्या जीवनातील रंग उडून गेला होता. या चित्रपटाचे कथानक त्या लोकांच्या व्यथा मांडते तेव्हा त्याही रंगांविना असाव्या असे त्याचे मत होते आणि मला ते पटलेही. माझ्या व्यक्तिरेखेलाही, जरी ते सुखवस्तू कुटुंबातील असले तरी, कारुण्याची झालर आहे. आपल्या लेकीला भेटण्यासाठी जाताना हायवेवर अडकलेल्या मातेची धडपड यातून दिसते. सामाजिक-राजनैतिक विषयांवर फारसे चित्रपट बनताना दिसत नाही. त्यामुळे मला अभिमान वाटतो अनुभवचा की त्याने या घटनांवर चित्रपट बनविला.
लॉकडाऊनने अनेकांना अनेक चित्रविचित्र अनुभव दिले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी माझ्या बाळाला जन्म दिला. परंतु मला कोणत्याही नातेवाईकाला भेटता आले नाही. खरं म्हणजे या काळातील अनेक घटना आहेत ज्या जगासमोर आलेल्या नाहीत. मी नेहमीच अनुभवच्या कामाची फॅन राहिले आहे. आम्ही एकमेकांना गेली २३ वर्ष ओळखतोय. मी याआधी त्याच्यासोबत ‘थप्पड’ मध्ये काम केले होते आणि तेव्हाच त्याला सांगितले होते की मला तुझ्या पुढील सर्व चित्रपटांचा भाग व्हायला आवडेल. भीडमध्ये काम करताना देखील त्याने मला मोजक्याच शब्दांत माझे कॅरॅक्टर समजावले. खरंतर तो कलाकाराला मोकळीक देतो. परंतु त्याच्या मर्यादा त्याने आखून दिलेल्या असतात. त्याला सीनमधून नेमके काय हवंय हे नेमके माहित असते. त्याचे लिखाण बारकाव्यांसकट लिहिलेले असते. त्यामुळे कोणत्याही कलाकाराला काम करणे सोपे जाते. तो कधीच कलाकारांना ‘ओव्हर इंस्ट्रक्ट’ करीत नाही. त्याची पटकथा एवढी बंदिस्त असते, जणू काही एकाद्या नाटकाचा प्रयोग सुरु आहे. अनुभव सोबत व्यक्तिरेखेबद्दल चर्चा करताना भूमिकेचे वेगवेगळे पदर आपसूक दिसू लागतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून तुमचा कस लागतो.