मुंबई - दिग्पाल लांजेकर दिग्दर्शत आगामी 'सुभेदार' चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पुण्यात दिमाखात पार पडला. 'श्रीगणेश कला क्रीडा केंद्रा'च्या भव्य मंचावर प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा ठरला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
'सुभेदार' या चित्रपटात सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या अद्वितीय पराक्रमाची कथा दाखवली जाणार आहे. कोंढाणा किल्ला जिंकत असताना झालेल्या निकराच्या लढाईत आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या सुभेदार तान्हाजींची ही कथा प्रेरणादायी आहे. याच विषयावर ओम राऊतने 'तान्हाजी' अजय देवगणसह हिंदी चित्रपट बनवला होता. या विषयाला न्याय देण्यासाठी मराठमोळ्या कलाकारांसह दिग्पाल लांजेकर सज्ज झाला आहे.
दिग्पाल लांजेकर याचा 'शिवाष्टक' मालिकेतला हा पाचवा चित्रपट आहे. याआधी त्याने दिग्दर्शित केलेल्या फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवाजी या चित्रपटांना शिवप्रेमी चित्रपटरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. गेल्या काही वर्षात ऐतिहासिक चित्रपटांना प्रचंड प्रेक्षक वर्ग मिळतो हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी यावर चित्रपट बनवले. पण दिग्पालने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या नरवीरांच्या पराक्रमावर बेतलेल्या आठ चित्रपटांच्या निर्मितींची घोषणा केली आणि सातत्याने मेहनत घेतली. त्याने ऐतिहासिक चित्रपटांसाठी आपला एक खास ठसा उमटवला असून प्रेक्षक वर्गही निर्माण करण्यात दिग्पालला यश लाभलंय. अर्थात प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान त्याला पेलायचे आहे.
एए फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट सादर करत असलेला 'सुभेदार' हा चित्रपट १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'सुभेदार' ची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढारकर, अनिल वार्खडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशीद जवळकर, शिवभक्त अनिकेत निशीद जवळकर आणि श्रृती दौंड यांनी केली आहे.