मुंबई- बॉलिवूडमध्ये अशी अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांना मोठ्या स्तरावर लॉन्च करण्यात आले. यापैकी अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले, तर काहींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली. अशाच एका चमकत्या स्टारचे नाव आहे हृतिक रोशन. आज 10 जानेवारीला या स्टार किडचा वाढदिवस आहे. हृतिक अभिनय आणि नृत्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर परदेशातही आहे. चला तर मग या खास प्रसंगी जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी.
हा आहे हृतिक रोशनचा फॅमिली ट्री - हृतिक रोशनचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत बॉलिवूडमधील पंजाबी-बंगाली कुटुंबात झाला. त्याचे वडील राकेश रोशन पंजाबी कुटुंबातील आहेत, तर आई पिंकी रोशन बंगाली कुटुंबातील आहे. राकेश रोशन एक बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. तर हृतिकचे आजोबा रोशनलाल संगीत दिग्दर्शक आणि आजोबा जे. ओमप्रकाश हे निर्माता आणि दिग्दर्शक होते. याशिवाय त्यांचे काका राजेश रोशन हे संगीतकार आहेत. हृतिकला एक मोठी बहीण देखील आहे, तिचे नाव सुनैना आहे. विशेष म्हणजे हृतिकचे नाव हृतिक रोशन नसून हृतिक नागरथ आहे.
तोतरेपणामुळे तोंडी परीक्षा टाळायचा हृतिक रोशन - मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनला लहानपणापासूनच तोतरेपणाची समस्या होती. शाळेतील तोंडी परीक्षा टाळण्यासाठी तो आजारी किंवा जखमी झाल्याचे नाटक करायचा. स्पीच थेरपीच्या माध्यमातून त्याची या समस्येतून सुटका झाली. तो अजूनही स्पीच थेरपी घेतो. कारण त्याला अजूनही भीती वाटते की तो पुन्हा तोतरा होईल.
फिल्मी करिअरची सुरुवात - हृतिक रोशनने अगदी लहान वयातच रुपेरी पडद्यावर काम करायला सुरुवात केली. निर्माता आणि दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांनी 1980 मध्ये एक चित्रपट बनवला, ज्याचे नाव होते 'आशा'. 6 वर्षांच्या हृतिकने या चित्रपटात एक छोटासा डान्स केला होता. ज्यासाठी त्याला फी म्हणून 100 रुपये देण्यात आले होते. त्याचवेळी 1986 मध्ये 'भगवान दादा' या चित्रपटातून त्यांनी संवादांच्या दुनियेत प्रवेश केला.
हृतिकला आले होते 30 हजारांहून अधिक लग्नाचे प्रस्ताव- हृतिकने वडिलांसोबत 'कोयला' आणि 'करण अर्जुन' या सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. येथूनच त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. चार वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले. पण हृतिक अजूनही काहीतरी मोठं करण्याची वाट पाहत होता. शेवटी ती वेळ आली जेव्हा राकेश रोशनने 2000 मध्ये आपल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटात मुलगा हृतिकला लॉन्च केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्याचवेळी या चित्रपटानंतर लाखो मुली हृतिकच्या वेड्या झाल्या. हृतिकला 30 हजारांहून अधिक लग्नाचे प्रस्ताव आले होते. या चित्रपटानंतर हृतिक 'फिजा', 'मिशन काश्मीर' सारख्या चित्रपटात दिसला. मात्र, काही काळानंतर हृतिकचे चित्रपट चालले नाहीत.
हृतिक रोशनचे हिट आणि सुपरहिट चित्रपट- हृतिक रोशनने आतापर्यंत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या भूमिकांमध्येही खूप प्रयोग केले आहेत. त्यापैकी काही आहेत- 'कोई मिल गया', 'लक्ष्य', 'क्रिश', 'धूम-2', 'जोधा अकबर', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'बँग बँग', 'अग्निपथ', 'काबिल', 'गुजारिश', 'सुपर ३०'.