हिंग, पुस्तक, तलवार नवी वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर - Nipun Dharmadhikari latest news
हिंग, पुस्तक, तलवार असे हटके शीर्षक असलेली वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर प्रसारित होणार आहे. या वेबसिरीजची कथा सहा व्यक्तींच्या अवतीभवती फिरणारी असून ही धमाल, विनोदी वेबसिरीज प्रेक्षकांना आठ भागात पाहायला मिळणार आहे. निपुण धर्माधिकारी हा या वेबसीरीजचा सुपरव्हिजन दिग्दर्शक आहे.
हिंग, पुस्तक, तलवार हे वाचताना थोडंसं विचित्र वाटलं तर नवल नाही. परंतु हे नाव आहे एका मराठी वेब सिरीजचं ज्याची निर्मिती करते आहे प्लॅनेट मराठी. या वेबसीरीजचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. ही वेबसीरीज लवकरच प्लॅनेट मराठी या पहिल्या नव्या कोऱ्या मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नावावरूनच काहीतरी हटके असणाऱ्या या वेबसिरीजची कथा सहा व्यक्तींच्या अवतीभवती फिरणारी असून ही धमाल, विनोदी वेबसिरीज प्रेक्षकांना आठ भागात पाहायला मिळणार आहे.
निपुण धर्माधिकारी हा या वेबसीरीजचा सुपरव्हिजन दिग्दर्शक आहे. या सीरीजबद्दल दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाला, प्रेक्षकांना पहिल्यांदाच जरा वेगळ्या आणि रंजक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्या जवळपास वावरणारी असून एखादे पात्र आपल्यातही कुठेतरी दडल्याचे भासवणारी आहे. मुळात यातील कथा दैनंदिन आयुष्याशी जवळीक साधणाऱ्या असल्याने त्या सर्वच वयोगातील प्रेक्षकांना आवडतील. हिंग, पुस्तक, तलवारच्या माध्यमातून काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला आहे, मला खात्री आहे हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल.
निपुणच्या दिमतीला मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे हे देखील दिग्दर्शक असणार आहेत. तर यात आलोक राजवाडे, नील साळेकर, सुशांत घाटगे, मानसी भवाळकर, शौनक चांदोरकर, क्षीतिज दाते, केतकी कुलकर्णी, मुग्धा हसमनीस आदी दमदार कलाकार पाहायला मिळतील. केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, निपुण धर्माधिकारी, अमृत आठवले यांच्या सिक्सटीन बाय सिक्सटी फोर प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत हिंग, पुस्तक, तलवार या वेबसिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे.
तर निर्माता केयूर गोडसे म्हणाला, या सिरीजचे दिग्दर्शन चार जणांनी केले आहे. निपुण मुख्य दिग्दर्शक असून त्याच्यासोबत मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वेही दिग्दर्शन करणार आहेत. चार दिग्दर्शक एकत्र आल्याने या चौघांची हुशारी आणि त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आपण एकाच वेबसेरीजमध्ये पाहू शकणार आहोत. विनोदात निपुणचा हातखंडा आहे. त्यामुळे या सिरीजतून दिसणारा, घडणारा विनोद नक्कीच वेगळा असणार. ही सिरीज सर्वांनी नक्कीच पाहावी, अशी आहे.
प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर म्हणाले, तेच तेच विषय हाताळण्यापेक्षा काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशानेच आम्ही ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. याआधी आम्ही एका लव्हस्टोरीची घोषणा केली होती. आता ही विनोदी सिरीज घेऊन येत आहोत. ओंकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांच्या लेखणीतून ही वेबसेरीज तयार झाली असून, ही वेबसिरीज मे २०२१ मध्ये प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.