महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Nitin Gadkari biopic : रुपेरी पडद्यावर झळकणार ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’चा जीवनप्रवास, ‘गडकरी’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Nitin Gadkari biopic : भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरींची ओळख 'हायवे मॅन ॲाफ इंडिया' अशीही आहे. तर काहीजण त्यांना 'रोडकरी' म्हणूनही ओळखतात. त्याच्या जीवनावर आधारित चरित्रपटाची निर्मिती केली जातेय. 'गडकरी' असं शीर्षक असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. दरम्यान, चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय.

Nitin Gadkari biopic
‘गडकरी’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 11:12 AM IST

Updated : Oct 6, 2023, 3:03 PM IST

मुंबई - Nitin Gadkari biopic : भारताच्या राजकारणात आज नितीन गडकरी हे नाव खूप मोठं आणि महत्त्वाचं मानलं जात. देशातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरींची ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही एक ओळख आहे. तमाम कार्यकर्ते आणि त्यांचे अनुयायी त्यांना 'रोडकरी' या नावानंही ओळखतात. देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरींच्या जीवनप्रवासावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. अभिजीत मजुमदार प्रस्तुत आणि अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी करत आहेत. या चित्रपटाचा बराचसा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पोस्टरवर पाठमोरी दिसणारी गडकरींची छबी नेमकी कोणत्या कलाकाराची आहे हे उघड झालेलं नाही. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण करणार, याची उत्कंठा चित्रपटरसिकांना लागून राहणार आहे. शीर्षक भूमिकेत कोण दिसेल, यावर आताच चित्रपटसृष्टीत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी सांगितलं की, ‘नितीन गडकरी यांची राजकीय कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आणि खास आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला ठाऊक आहेतच. विकासाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य व उमेदीचा काळही तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न ‘गडकरी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.’

नितीन गडकरींचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि रंजक असल्यामुळे राजकारणी म्हणून परिचीत असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख या चित्रपटातून करुन दिली जाईल, असा दावा निर्मात्यांनी केलाय. २७ ॲाक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

Last Updated : Oct 6, 2023, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details