मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने शुक्रवारी रात्री अबू धाबी येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळा (IIFA) 2023 मध्ये तिच्या लक्षवेधी पोसाखाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ग्रँड अवॉर्ड नाईटसाठी ऑल-व्हाइट फेदर गाउन परिधान केलेली उर्वशी अगदी कथेतील परीसारखी दिसत होती. या कार्यक्रमात तिला क्रिकेटपटू ऋषभ पंतबद्दल विचारण्यात आले, परंतु तिने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि चला आयफाबद्दल बोलू, असे म्हटले.
व्हिडिओमध्ये, मुलाखतकाराने ऋषभ पंतबद्दल विचारले असता, उर्वशी म्हणाली, 'मी आयफामध्ये आहे. आम्ही चित्रपट साजरे करत आहोत, आम्ही कलाकार, दिग्दर्शन आणि प्रत्येक गोष्ट साजरी करत आहोत. त्यामुळे याबद्दल बोलूयात, क्रिकेटबद्दल नको'. यावर मुलाखत घेणाऱ्याने पुढे विचारले की, 'पण तुम्ही एक क्रिकेटच्या चाहत्या आहात, चाहत्या म्हणून बोला'. यावर उर्वशीने मुलाखत घेणाऱ्यालाच प्रतिप्रश्न केला आणि विचारले, 'ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारते. तुम्हाला वाटते की आयपीएल कोण जिंकणार आहे?' मुलाखतकाराने उत्तर दिले, 'जो सर्वोत्तम आहे तोच जिंकेल'. हाच प्रश्न त्याने उर्वशीला विचारला असता ती म्हणाली, 'मला खरोखर धोनीमुळे चेन्नई सुपर किंग्ज जिंकायला हवे आहेत'.