मुंबई - Hema Malini 75th Birthday :हेमा मालिनी आज, 16 ऑक्टोबर आपला 75वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान,त्यांची मुलगी-अभिनेत्री ईशा देओलनं त्यांना वाढदिवसाच्या या खास दिवशी शुभेच्छा देत, काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टमध्ये तिनं आपल्या आईसाठी खास संदेश दिला आहे. ईशा नेहमीच तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. ती कधीच तिच्या आईवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कमी पडत नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये या मायलेकी एकत्र दिसतात.
ईशा देओलची पोस्ट : फोटो शेअर करताना ईशा देओलनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे मम्मा. हा दिवस सदैव साजरा होवो. एक दैवी स्त्री, जी आपले जीवन सन्मानाने स्वतःच्या अटींवर जगते. एक प्रेमळ मुलगी आणि पत्नी, दयाळू आई, आराध्य आजी, विलक्षण अभिनेत्री, सुंदर नर्तकी, प्रामाणिक राजकारणी ही यादी आणखी पुढे जाऊ शकते. तू एक शक्ती आहेस आनंदी, निरोगी रहा. मी तुझ्यावर प्रेम करते', असा प्रेमाचा वर्षाव ईशानं तिच्या आईवर केला आहे. फोटोमध्ये ईशा देओल आई हेमा मालिनीला किस करताना दिसत आहे. याशिवाय फोटोत हेमा मालिनीने पिवळ्या रंगाची फुलांची साडी नेसली आहे, तर ईशानं हलक्या तपकिरी रंगाचा सूट परिधान केला आहे. याशिवाय या मायलेकीनं केसांमध्ये गजरा लावला आहे. या दोन्ही फोटोमध्ये आई आणि मुलीचा बॉन्ड मजबूत दिसत आहे.