मुंबई - भारतात गझल गायकी करणारे मोजकेच गायक सापडतील आणि त्यामध्ये हरिहरन यांचे नाव खूप वर आहे. त्यांच्या अप्रतिम गायकीचे अनेक चाहते आहेत, जे जगभरात पसरलेले आहेत. आता हरिहरन 'दूरीयां...' ही एक नवीन गझल घेऊन आले आहेत ज्यात गायिका साधना जेजुरीकर यांनीही त्यांना साथ दिली आहे. मखमली आवाजाचे धनी असलेले गायक हरिहरन यांनी गायलेल्या गझलवर सांगितिक विश्वातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
'दूरीयां...' ची निर्मिती साधना जेजुरीकर यांची असून ती समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी पिकल म्युझिकच्या बॅनरखाली प्रकाशित केली आहे. हरिहरन नेहमीच नवीन काही शिकण्याची इच्छाशक्ती ठेवतात त्यामुळेच त्यांनी काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात केले आहेत. गायिका साधना जेजुरीकर यांच्या सोबत गायलेल्या या गझलला अल्पावधीतीच रसिकांची पसंती मिळत आहे. ही गझल ऐकल्यावर कळते की आजही हरिहरन संगीतप्रेमींच्या मनावर का अधिराज्य गाजवत आहेत.
हरीहरन आणि साधना जेजुरीकर यांचे आवाज तयारीचे असून त्यांनी प्रत्येक शब्द अर्थानुरुप गायला आहे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट गायकीच्या आधारे या गझलला न्याय दिला आहे. 'दूरीयां...'बाबत हरीहरन यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, 'माझं आणि गझल गायकीचे एक अनोखे नाते आहे. कोणतीही गझल गाताना मला आत्मिक समाधान मिळत असते. आजवर मी बऱ्याच गझल् गायल्या आहेत, परंतु 'दूरीयां...' मध्ये एक विलक्षण अनोखी गोष्ट आहे. या गझलच्या मदन पाल यांच्या शब्दांना न्याय मिळवून देणं माझं आध्य कर्तव्य होतं ते मी पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे. कैलाश गंधर्व यांची संगीतरचना अद्भुत असून ती गाताना मला आनंदाची अनुभूती मिळाली. समर्पक शब्दरचना आणि अद्भूत संगीतरचना यांचा मिलाफ म्हणजे 'दूरीयां...'. रसिक माझ्या या प्रयत्नांनाही पाठिंबा देतील अशी मला आशा आहे.'