मुंबई -Allu Arjun : 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनसाठी आज 21 नोव्हेंबर हा खास दिवस आहे. आज 21 नोव्हेंबर रोजी त्याची लाडकी मुलगी अर्हा तिचा 7वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जुननं त्याच्या लाडक्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यानं या पोस्टद्वारे आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत. त्याचबरोबर अल्लू अर्जुनसोबत त्याची पत्नी स्नेहा रेड्डीनं देखील मुलगी अर्हाला आशीर्वाद दिलाय. अल्लू अर्जुननं आपल्या मुलीसोबत फोटो शेअर करत लिहलं, 'माझ्या लिटल राजकुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा' हा फोटो अभिनेता वरुण तेज कोनिडेलाच्या इटलीतील लग्नातलाआहे. अल्लू अर्जुन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह या सोहळ्यात गेला होता.
अल्लू अर्जुनची इंस्टा स्टोरी पोस्ट : अल्लू अर्जुननं 7व्या वाढदिवसानिमित्त मुलगी अर्हाचं तीन सुंदर फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केलेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, 'हॅप्पी बर्थडे टू माय जॉय'. या फोटोमध्ये अर्हा ही चालताना दिसतेय. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये ती एका मिररसमोर उभी आहे. याशिवाय शेवटच्या फोटोत तिला अल्लू अर्जुननं कडेवर उचलेलंय. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अल्लू अर्जुननं 6 मार्च 2011 रोजी नॉन-फिल्मी गर्ल स्नेहा रेड्डीशी लग्न केलं होतं. अल्लू अर्जुन लग्नाच्या वेळी 29 वर्षांचा होता आणि आज तो 41 वर्षांचा आहे. या लग्नापासून त्याला आणि स्नेहाला एक मुलगा अयान आणि मुलगी अर्हा आहे. या जोडप्याला लग्नाच्या तीन वर्षानंतर 3 एप्रिल 2014 रोजी मुलगा अयान झाला. त्यानंतर त्यांना 21 नोव्हेंबर 2016 रोजी मुलगी अर्हा झाली.