मुंबई - बिग बी 11 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ यांना हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन सहा दशकांहून अधिक काळ लोटला असूनही ते आजही छोट्या आणि पडद्यावरचे बिग बॉस आहेत. तरुणपणात कुटुंबाच्या जबाबदारीचं उचलेलं ओझं आजही ते आपल्या मजबूत खांद्यावरुन वाहत आहेत. त्यांच्या घरात सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या पत्नी जया बच्चन यांच्यासह मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय बच्चन चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हणून कुंटुंबाच्या कमाईत भर घालतात. या सर्वांच्या कमाईकडं एक नजर टाकली तर त्यात बिग बींचं पारडं जड आहे.
साधारणपणे लोक वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात आणि घरी विश्रांती घेतात. मात्र 81 वर्षांचे बिग बी त्यांच्या उच्च-प्रोफाइल स्टार कुटुंबाचे प्रमुख आधारस्तभ आहेत. 2000 मध्ये कारकिर्द संपली असं वाटत असतानाच त्यातून भरारी घेत स्वतःला सावरलं आणि आज ते खंबीरपणे फिल्म इंडस्ट्रीत आपला दबदबा कायम ठेवून आहेत. त्यांच्या घरात सर्वच सदस्य फिल्म इंडस्ट्रीतून कमाई करतात. यात बिग बींची कमाई मिस्टर आणि मिसेस बच्चन (अभिषेक आणि ऐश्वर्या) पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन दर महिन्याला 5 कोटींहून अधिक कमावत आहेत आणि त्यांची वार्षिक कमाई 60 कोटी रुपयांची आहे. बिग बी यांची एकूण संपत्ती 3390 कोटी रुपये इतकी आहे. अशा परिस्थितीत बिग बींच्या कमाईकडे पाहता त्याच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे, असंच म्हणता येईल. बच्चन कुटुंबात बिग बींनंतर त्यांची एकुलती एक सून ऐश्वर्या राय घराला खूप सपोर्ट करते. ऐशची एकूण संपत्ती सध्या 823 कोटी रुपयांच्या घरात आहे. ऐश्वर्या एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते. चित्रपट आणि जाहिरातींसह ऐश वर्षाला सुमारे ५० कोटी रुपये कमावते.त्याचबरोबर बिग बींची पत्नी जया बच्चन राजकारण आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. या वर्षी जया रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये त्यादिसल्या होत्या. जया यांची एकूण संपत्ती 640 कोटी रुपये आहे. अभिषेक बच्चन कुटुंबात सर्वात कमी कमावतो. अभिषेक महिन्याला 2 कोटी रुपये आणि वार्षिक 24 कोटी रुपये कमावतो. अभिषेकची एकूण संपत्ती सुमारे 230 कोटी रुपये आहे.