मुंबई - पावसाळी वातावरणात काहीतरी गरमा गरम मिळालं की तृप्ती मिळते. अशाच प्रकारची अनुभूती आली पुण्यातील ‘मेट्रो’ प्रवाशांना. ‘गरमा गरम’ सोनाली कुलकर्णी ने त्यांना दिला ‘फील दि हीट’ चा अनुभव. निमित्त होते ‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘गरमा गरमा’ या गाण्याचे. नुकतेच हे गाणे पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. या वेळी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थितांना घायाळ केले. तर या कार्यक्रमात अधिकच रंगत आणली ती, ‘गरमा गरम’च्या गायिका वैशाली सामंत यांनी. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह प्रवाशांनीही ‘गरमा गरम’वर ठेका धरला. एकंदरच मेट्रो स्थानकात सगळे जण ‘फील दि हीट’ चा अनुभव घेत होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ‘’प्रेक्षकांच्या, प्रवाशांच्या उपस्थितीत, ‘गरमा गरम’ हे गाणे मेट्रो स्थानकात प्रदर्शित होणे ही आनंद देणारी गोष्ट आहे. प्रमोशनचा हा एक वेगळा प्रकार आहे. यामुळे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या थेट प्रतिक्रिया मिळतात. ‘तमाशा लाईव्ह’ हा खऱ्या अर्थाने वेगळा चित्रपट आहे. आजच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, चित्रपटालाही असाच भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.”
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांना श्रोते भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘छंद लागला’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रील्स बनवण्याचा छंद लावला आहे. त्यातच आता या ‘गरमा गरम’ गाण्यावर नृत्य करण्याचा मोहही प्रेक्षकांना आवरता आला नाही. तेही या वेळी ‘तमाशा लाईव्ह’च्या टीमसोबत थिरकले. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह चित्रपटाच्या टीमने मेट्रो स्थानकात प्रवाशांना तिकीट वाटपही केले याशिवाय प्रवाशांसोबत संवादही साधला. या संगीत सोहळ्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला.