मुंबई- बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार संतोषी एक दशकानंतर पुन्हा नव्या चित्रपटासह सज्ज झाले आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चिन्मयने त्याच्या सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत चिन्मयने याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टरवरून हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांची हत्या करणारा नथूराम गोडसे यांच्यातील वैचारिक वाद दाखवणारा चित्रपट असेल असे वाटते.
विशेष म्हणजे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या पोस्टरवर रिलीज तारीख २६ जानेवारी २०२३ जाहीर करण्यात आली आहे. नेमके याच वेळी पठाण हा शाहरुख खानचा चित्रपट रिलीज होत आहे. पठाणमधून शाहरुख चार वर्षानंतर पुनरागमन करतोय तर त्याची टक्कर राजकुमार संतोषीच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटासोबत होणार आहे. सध्या पठाण या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही समाजातील एक गट करत आहे. हाच गट ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाला पाठींबा देऊ शकतो. त्यामुळे दोन्ही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होऊ शकते.
एकापाठोपाठ एक सिनेमे पडल्यावर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता शाहरुख खान तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर 'पठाण' (Pathan Movie) मधून मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हा एक थक्क करायला लावणाऱ्या अॅक्शनने परिपूर्ण असा चित्रपट असून त्यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आतापर्यंत कधीही न दिसलेल्या रूपात दिसणार आहे, तर शाहरुख जॉन अब्राहमच्या विरोधात उभा ठाकलेला दिसणार असून चांगल्या आणि वाईटाचा थरारक संघर्ष यातून दिसेल.