मुंबई - चित्रपट दिग्दर्शक ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या पौराणिक चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. दाक्षिणात्य स्टार प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती, सनी सिंग आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स आणि पात्रांच्या विचीत्र लूकमुळे चौफेर टीका होत आहे. या चित्रपटावर भारतात बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. दरम्यान, टीव्ही शो 'महाभारत' फेम अभिनेता गजेंद्र चौहानने एक मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत गजेंद्र चौहान यांनी सांगितले आहे की, तत्कालीन सरकारने महाभारतातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता आणि महाभारताच्या निर्मात्यांनी एका रात्रीत हे प्रकरण न्यायालयात निकाली काढले होते.
बीआर चोप्रा यांनी बनवलेल्या 'महाभारत'मध्ये गजेंद्र चौहान यांनी युधिष्ठिराची भूमिका साकारली होती. आजही लोक त्यांना युधिष्ठिराच्या नावाने ओळखतात. आदिपुरुष चित्रपटाच्या निमित्ताने उडालेल्या गदारोळात एका मुलाखतीत गजेंद्र चौहान म्हणाले, महाभारताच्या अशा निषेधाचा संदर्भ देताना मला आठवते की सप्टेंबर १९८८ मध्ये ताज हॉटेलमध्ये महाभारत मालिका सुरू करण्यासाठी एक पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. महाभारत २ ऑक्टोबर १९८८ पासून सुरू होते. प्रसारित होण्यापूर्वी दूरदर्शनवर त्याचे प्रीव्ह्यू झाले होते, पण तत्कालीन सरकारने या मालिकेतील काही डायलॉग्सवर आक्षेप घेतला होता, ते डायलॉग राज बब्बर यांनी लिहिले होते, तो डायलॉग होता ज्यात राजा भरत म्हणतो की राजपथ हा वंश नाही. तो गुणवत्तेच्या आधारावर व्हायला हवा, हा संवाद त्यावेळच्या सरकारला खटकला आणि त्यांनी हा संवाद शोमधून काढून टाकण्याची मागणी केली.
गजेंद्र चौहान यांनी पुढे सांगितले की 'कालचक्र' देखील या वादातून कसे सुटू शकले नाही. ते म्हणाले, महाभारताची सुरुवात कालचक्राने होते. परंतु यावरही तत्कालिन सरकारने आक्षेप घेतला आणि म्हटले की हे चक्र जनता दल पक्षाचे प्रचार करते. त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाला त्यावेळच्या सरकारनेही विरोध करून ते काढून टाकण्यास सांगितले.
गजेंद्र यांनी पुढे सांगितले की, 'बीआर चोप्रा महाभारताची रचना, त्यातील पात्रे, प्रत्येक संवाद आणि त्याचे लेखक याबद्दल पूर्णपणे स्पष्ट आणि समाधानी होते, त्यांना कोणत्याही किंमतीवर सरकारची आज्ञा मानायला तयार व्हायचे नव्हते, यासाठी ते न्यायालयात गेले. आणि आपली बाजू ठेवली, माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांनी 1 ऑक्टोबरच्या रात्रीच कोर्टातून मंजुरी घेतली होती आणि 2 ऑक्टोबर 1988 पासून महाभारत लोकांमध्ये पोहोचले होते.'