मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा अॅक्शन ड्रामा 'गदर २' आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर 'ओ माय गॉड २'ने देखील १०० कोटींहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. मात्र, तिसऱ्या आठवड्यात या दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा वेग मंदावला आहे. 'ओ माय गॉड २' आणि 'गदर २'ने रिलीजच्या १५ व्या दिवशी रुपेरी पडद्यावर किती कोटींचा व्यवसाय हे जाणून घेऊया...
'गदर २' ची १५व्या दिवशीची कमाई :सनी देओलच्या चित्रपटाची क्रेझ हा प्रेक्षकांच्या डोक्यावर चढली आहे. २००१ मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वल असलेल्या 'गदर २'ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आजही जात आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रुपेरी पडद्यावर नोटा छापल्या. मात्र तिसऱ्या आठवड्यात 'गदर २'च्या कमाईचा वेग मंदावला असून कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळत आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'गदर २'ने प्रदर्शनाच्या १५व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी ६.७० कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, 'गदर २'ची एकूण कमाई ४२५.८० कोटी रुपयांवर गेली आहे.