मुंबई- अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर' चित्रपटाची हवा जोरदार वाहू लागली आहे. रिलीज पूर्वीच सनी देओलच्या ढाई किलोचा हात बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू लागलाय. सनी देओल आणि अमिषा पटेलला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे जाणवते. गदर चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसतोय. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या मल्टीप्लेक्स चेनमधून तब्बल २ लाख तिकीटांची विक्री झाली आहे.
झी स्टुडिओने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अॅडव्हान्स बुकिंगबद्दलची माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या थिएटर्समधून सनी देओल आणि अमिषा पटेलच्या गदर २ चित्रपटाचे २ लाखाहून अधिक तिकीटांचे अअॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.
'गदर २' च्या निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, '२,००,००० पेक्षा जास्त तिकिटे PVR सिनेमा, InoxMovies आणि Cinepolis India वर आधीच बुक झाली आहेत. गदर २ चित्रपट उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.' दिल्ली/यूपी पट्ट्यात कहर सुरू आहे. एकूण शोपैकी ४० टक्के शो आधीच आगाऊ बुकिंगमध्ये विकले गेले आहेत. गदर २ दिल्ली/यूपी पट्ट्यात ८० ते ८५ टक्के व्याप्तीसह चालेल अशी अपेक्षा आहे. OMG 2 ला टक्कर देण्यासाठी हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'गदर २' चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाली तेव्हापासून चित्रपटाबद्दलची चर्चा सुरू झाली होती. या चित्रपटाची कथा गदर चित्रपटाचा जिथे अखेर झाला होता तिथं पासून सुरू होते. चित्रपट प्रेक्षकांना आवडत असल्याचे यापूर्वी झालेल्या स्क्रिनिंगमधून निर्मात्यांच्या लक्षात आले आहे. अलिकडेच सनी देओलने चित्रपटाचे खास स्क्रिनिंग भारतीय सैनिकांसाठी केले होते. यामध्ये जवानांना चित्रपट खूप आवडल्याचे स्पष्ट झाले. अनेकांनी जोरदार घोषणाबाजी करत चित्रपट आवडल्याचे कृतीतून दाखवून दिले. गेल्या काही दिवसापासून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अगदी वाघा बॉर्डरवर जाऊनही चित्रपटाच्या टीमने प्रमोशन केले होते.