मुंबई : 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या जबरदस्त कमाई करत आहे. शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ३ दिवसात बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटींहून अधिक रुपयांची ओपनिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 'गदर २'ने अधिक उंच झेप घेतली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४३ कोटींची कमाई केली, त्यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८३ कोटी रुपयांवर पोहोचले. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ५२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे सर्व शोज 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. आतापर्यंत फक्त ४ हिंदी चित्रपट होते ज्यांनी बॉक्स ऑफिसवर एकाच दिवसात ५० कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली, यामध्ये 'पठाण', 'केजीएफ २', 'वॉर' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' (हा नंतर वाईट पद्धतीने आपटला) आणि आता या खास यादीत 'गदर २' देखील दाखल झाला आहे.
'गदर २' ची कमाई : दरम्यान आता 'गदर २' हा रविवारी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. या कलेक्शनसह चित्रपटाने तीन दिवसांत १३५ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सनी देओलचा तारा सिंह अवतार अजूनही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम प्रस्थापित करेल असे सध्या दिसत आहे. तसेच १५ ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे 'गदर २' पुन्हा एकदा चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. आता 'गदर २' हा चित्रपट आठवडाभरात कोणते मोठे रेकॉर्ड करेल, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.