महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 5:45 PM IST

ETV Bharat / entertainment

ज्येष्ठ अभिनेता ज्युनियर मेहमूद यांच्यावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेता ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमध्ये शोकलहर पाहायला मिळाली. अनेकांनी सकाळी त्यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये त्यांचे जुने मित्र सचिन पिळगावकर, अलि असगरस, जॉनी लीव्हर, राकेश बेदी, सुदेश भोसले, आदित्य पांचोलीसह अनेक सेलेब्रिटींनी ज्युनियर मेहमूद यांना अखेरचा निरोप दिला.

Junior Mehmood passed away
अभिनेता ज्युनियर मेहमूद अंत्यसंस्कार

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता ज्युनियर मेहमूद गेल्या काही काळापासून कॅन्सरच्या आजाराशी लढत होते. त्यांची ही झुंज संपली असून वयाच्या 67 व्या वर्षी शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमध्ये शोकलहर पाहायला मिळाली. अनेकांनी सकाळी त्यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये त्यांचे जुने मित्र सचिन पिळगावकर, अलि असगरसह पोहोचला होता. या प्रसंगी जॉनी लीव्हर, राकेश बेदी, सुदेश भोसले, आदित्य पांचोली, अवतार गिल आणि रझा मुराद यांच्यासह सेलिब्रिटींनी शुक्रवारी ज्युनियर मेहमूद यांना अखेरचा निरोप दिला.

ज्युनियर मेहमूदच्या जवळच्या मित्राने त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, "त्यांचं काल रात्री 2 वाजता निधन झालं. त्यांना पोटाचा कॅन्सर होता आणि गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत बरी नव्हती. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील." त्यांच्या कॅन्सरच्या आजाराचं निदान व्हायला उशीर झाला. तोपर्यंत कॅन्सर चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत असताना त्यांना खूप वेदना होत होत्या. यावर पर्याय नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं. अखेरच्या काळात त्यांचा मुलगा हुसनेन आणि मित्र जॉनी लिव्हर यांनी त्यांची शुश्रूषा केली.

ज्युनियर मेहमूदचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी एएनआयला सांगितले की, "तो 2 महिन्यांपासून आजारी होता आणि सुरुवातीला आम्हाला वाटले की त्याला काही किरकोळ समस्या असेल पण त्यानंतर अचानक त्याचे वजन कमी होऊ लागले. आणि जेव्हा मेडिकल रिपोर्ट आला तेव्हा त्यात कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले. यकृत आणि फुफ्फुस आणि आतड्यात एक गाठ होती आणि त्याला कावीळही झाली होती. त्यामुळे उपचार सुरू आहेत, पण डॉक्टरांनी सांगितले की हा कॅन्सर चौथ्या टप्प्याचा आहे."

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर यांनी दोन दिवसापूर्वी त्यांची भेट घेतली होती. ज्युनियर मेहमूद यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यानंतर त्यांनी केलं होतं. मंगळवारी इंस्टाग्रामवर सचिनने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते, "माझा बालपणीचा मित्र ज्युनियर मेहमूद एका जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे, त्याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना प्रार्थना करण्याची विनंती करतो. काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी व्हिडिओ संभाषण केलं होतं आणि त्याला भेटायला गेलो होतो. आज मात्र तो औषधोपचार घेत असल्यानं झोपला होता. मी त्याचा मुलगा आणि जॉनी लीव्हर यांच्यासोबत संपर्कात आहे. देव त्याला आशीर्वाद देवो."

ज्युनियर मेहमूद म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिवंगत अभिनेत्याचं नाव नईम सय्यद असं आहे. हे नाव त्यांना मेहमूद अलीने दिले होते. ज्युनियर मेहमूद यांनी 'ब्रह्मचारी', 'मेरा नाम जोकर', 'परवरिश' 'दो और दो पांच' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे असलेल्या ज्युनियर मेहमूद यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीमध्ये 7 वेगवेगळ्या भाषांमधील 265 चित्रपटांमध्ये काम केले आणि 6 मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले आहे. कटी पतंग, घर घर की कहानी, बचपन, आन मिलो सजना, उस्ताद पेड्रो , रामू उस्ताद, लडकी पासंद है, कारवां, हाथी मेरे साथी, छोटी बहू, चिंगारी , हंगामा, हरे रामा हरे कृष्ण , आप की कसम, गीत गाता चाल , करिश्मा कुदरत का, सस्ती दुल्हन महेंगा दुल्हा, खेल मोहब्बत का, पति पैसा और प्यार , आग के शोले , जैसी करणी वैसी भरणी, प्यार का कर्ज, जवानी जिंदाबाद, गुरुदेव, धरम का इंसाफ, चौराहा, जर्नी बॉम्बे टू गोवा अशी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची मोठी यादी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details