मुंबई - Fukrey 3 BO collection day 1: 'फुक्रे' आणि 'फुक्रे रिटर्न्स' या दोन चित्रपटाच्या यशानंतर पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मनजूत सिंग आणि ऋचा चड्ढा पुन्हा एकदा फुक्रे 3 साठी एकत्र आले आहेत. 'फुक्रे 3' चित्रपट ओपनिंग डेच्या दिवशी अंदाजे 8 कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर करेल असा अंदाज आहे. पहिल्या दिवसाचा व्यवसाय प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या वॉक-इनवर अवलंबून असेल. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
मृघदीप सिंग लांबा यांनी 'फुक्रे 3' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कथेबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटाच्या 150 मिनिटे 18 सेकंद (2 तास 30 मिनिटे 18 सेकंद) इतक्या रन टाईमला संमती दिली आहे. फुक्रे 3 चित्रपटाला U/A म्हणून प्रमाणित देण्यात आले आहे.
'फुक्रे 3' भारतात 28 सप्टेंबर रोजी सुमारे 2700 स्क्रीन्सवर मोठ्या प्रमाणात रिलीज झाला आहे. हा चित्रपट फुक्रे चित्रपटाच्या फ्रँचायझीचा आजपर्यंतचा सर्वात विस्तृत रिलीज मानला जात आहे. फुक्रे 3 चित्रपटाच्या आगाऊ बुकिंग शनिवारी संध्याकाळी सुरू झाली होती आणि याला मिळालेला प्रतिसाद खूपच सकारात्मक राहिला आहे.
आजच्या घडीला 'फुक्रे 3' चा ओपनिंग डेचा अंदाजे 8 कोटी असावा. त्यानंतर चार दिवस चित्रपटाच्या बॉक्स ऑफिससाठी लाभदायक ठरु शकतात. सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने विकेंडला जोडून आलेल्या सुट्टीचा लाभ बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो. तरुणाईला आवडेल अशी चित्रपटाची कथा आहे त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी चित्रपटगृहाकडे वळतील अशी अपेक्षा निर्मात्यांना वाटते.