मुंबई- सनी देओल आणि अमिषा पटेल यांची भूमिका असलेल्या 'गदर २' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून हवा गरम व्हायला सुरुवात झाली होती. चित्रपटाची गाणी, पोस्टर्स आणि टीझरने चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या. अखेर तो दिवस उगवला आणि बहुप्रतीक्षित 'गदर २' चित्रपट थिएटरच्या पडद्यावर झळकला.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. अॅडव्हान्स बुकिंग ट्रेंडमध्ये या चित्रपटाला आधीच उत्तम प्रतिसाद मिळाला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी आपली समीक्षा द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक पोस्ट झळकल्या आहेत.
सनी देओलने सादर केलेले अॅक्शन सीन्स आणि कडक संवादामुळे चित्रपटाचे मनोरंजन मुल्य वाढले आहे. प्रेक्षकांना भरपूर नॉस्टॅल्जिक बनवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने विशेषत: मास सर्किट्समध्ये मोठा चाहतावर्ग मिळवला असला तरी, समीक्षकांनी चित्रपटाची कथा कालबाह्य झाल्याचे म्हणत टीकास्त्र सोडल्याचे दिसते.
सनी देओल आणि गदर प्रेमी चाहत्यांनी चित्रपटाला ४.५ स्टार देत ब्लॉकबस्टर म्हणून घोषित केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग आवडल्याचे चाहत्यांनी म्हटलंय. सनी देओलची जबरदस्त भूमिका आणि अनिल शर्माच्या दिग्दर्शनाचे कौतुक चाहत्यांनी आपल्या रिव्ह्युत केले आहे.
दुसऱ्या बाजूला काही जणांनी 'गदर २' ने निराश केल्याचा सूर आळवलाय. नव्वदच्या दशकातील इमोशन्स, कृती आणि सादरीकरण यामुळे हा चित्रपट एक नंबर बॅकडेटेड असल्याचे ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय. उत्कर्ष शर्मा पुन्हा एकदा लॉन्च झाला, सनी देओलचे सीन्स खूपच कमी आहेत, व्हिज्युअल भयानक आहेत आणि संवाद बरे असल्याचेही निरीक्षण यात नोंदवण्यात आले आहे.