हिसार :हरियाणवी गायक राजू पंजाबीचे वयाच्या ४०व्या वर्षी हरियाणातील रुग्णालयात निधन झाले. राजू पंजाबी हा काही दिवसापूर्वी हरियाणातील हिसार येथील रुग्णालयात दाखल होता. राजूवर काविळीचे उपचार सुरू होते. दरम्यान आता या गायकाच्या निधनामुळे हरियाणवी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. हिसार येथील रावतसर खेडा या गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजू पंजाबी यांच्या निधनाने हरियाणवी संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. राजू पंजाबीच्या निधनाची बातमी मिळताच त्यांचे नातेवाईक आणि चाहते हिस्सारला पोहोचू लागले आहेत.
रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर राजू पंजाबी प्रकृती पुन्हा बिघडली : काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो घरी परतला होता, मात्र त्याची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. गायक केडी देसी रॉकने हॉस्पिटलच्या बेडवरून राजूचा फोटो शेअर करून लिहिले होते की, 'राजू परत आला आहे'. त्यानंतर राजूबद्दल कुठलीच अपडेट आली नाही.
सीएम खट्टर यांनी राजू पंजाबी यांची श्रद्धांजली :राजू पंजाबी यांच्या निधनानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही ट्विट करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'प्रसिद्ध हरियाणवी गायक आणि संगीत निर्माता राजू पंजाबीजी यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या जाण्याने हरियाणा संगीत उद्योगाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास त्यांच्या पावन चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती! अशी त्यांनी पोस्ट केली आहे.
राजू पंजाबीचे शेवटचे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले : काही दिवसांपूर्वी राजूने त्याचे शेवटचे गाणे 'आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था' रिलीज केले होते. त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट देखील त्याच्या गाण्याबद्दलची आहे. राजूने २० ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ कोलाज शेअर केला आणि लिहिले होते, 'आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा.' तसेच राजूने 'पंजाबी को अच्छा लगे से', 'देसी देसी', 'तू चीज लाजवाब', 'लास्ट पेग' आणि 'भांग मेरे यारा ने' यांसारखी गाणी गायली आहेत. याशिवाय त्याने सपना चौधरीसोबत एका प्रोजेक्टवर काम केले आहे.