मुंबई - साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रितीचा आगामी पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष'ची लोकांमध्ये सध्या विशेष चर्चेत आहे. प्रभास आणि क्रितीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ काही दिवस उरले आहेत. दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाबाबत आता मोठी बातमी येत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि आलिया भट्टचा पती रणबीर कपूर वंचित मुलांसाठी 10,000 तिकिटे खरेदी करून त्यांना 'आदिपुरुष' चित्रपट दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, रणबीर कपूर हा हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात सुरक्षित कलाकारांपैकी एक आहे. आता तो प्रभास आणि क्रिती स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाला सपोर्ट करण्यासाठी पुढे आला आहे. रणबीर कपूर देशभरातील वंचित मुलांना आदिपुरुष चित्रपटाची १०,००० तिकिटे दान करणार आहे.
असे करण्याचे कारण काय?- 'दंगल' फेम अभिनेता नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर स्वतः रामची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची पत्नी आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. रणबीर-आलिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' या चित्रपटाची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. रणबीरला वाटते की, त्याला रामायणातून खूप काही शिकायला मिळाले आणि आता येणाऱ्या पिढ्यांना भगवान रामाबद्दल माहिती व्हावी अशी त्याची इच्छा आहे.
रणबीर कपूर तिकीट कसे दान करणार? - एका एनजीओच्या माध्यमातून रणबीर हिंदी पट्ट्यातील गरीब मुलांना 10,000 तिकिटे दान करणार आहे. आदिपुरुषचे निर्माते रणबीर कपूरच्या या कौतुकास्पद पाऊलाबद्दल अभिनंदन करत आहेत तसेच त्याचे आभारही मानत आहेत. 500 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 16 जून रोजी देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.