महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

EXCLUSIVE INTERVIEW : सोनाक्षी सिन्हा म्हणते, 'मेकअप शिवाय काम करताना जराही भीती वाटली नाही!' - मेकअप शिवाय सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा डिजीटल पदार्पण असलेली दहाड ही वेब सिरीज ओटीटीवर रिलीज झाली आहे. यात ती चतुर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारते. यासाठी तिने मेकअप न करणे ही दिग्दर्शकाला अपेक्षित होते. त्यानुसार संपूर्ण चित्रपटात कॅमेऱ्याला सामोरे जाताना तिने चेहऱ्यावर मेकअप केला नव्हता. याबद्दल ती आमच्या प्रतिनिधीशी सविस्तर बोलली आहे.

Etv Bharat
सोनाक्षी सिन्हा

By

Published : May 13, 2023, 4:00 PM IST

मुंबई- साधारण १२-१३ वर्षांपूर्वी सोनाक्षी सिन्हा दबंग मधून सलमान खानची हिरॉईन म्हणून चित्रपट सृष्टीत दाखल झाली. लगेचच अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांची ही लाडकी लेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. रावडी राठोड, सन ऑफ सरदार, दबंग २, लुटेरा, बॉस, बुलेट राजा, आर...राजकुमार, हॉलिडे, मिशन मंगल, दबंग ३, भुज, डबल एक्सएल सारख्या अनेक चित्रपटांतून सोनाक्षी झळकली आणि फिल्म इंडस्ट्रीमधील एक टॉपची अभिनेत्री म्हणून गणली जाऊ लागली. आता सोनाक्षी ओटीटीवर पदार्पण करीत आहे. दहाड या वेब सीरिजमध्ये ती पहिल्यांदाच महिला पोलीस अधिकारी साकारत आहे. नुकत्याच सोनाक्षी सिन्हा ने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम बरोबर गप्पा मारल्या आणि अनेक गोष्टींचा उलगडा केला.

सोनाक्षी, तू बऱ्याच भूमिका साकारल्या आहेस ज्यात तू पोलीस अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला वावरली आहेस. आता तू स्वतः महिला पोलीस अधिकारी साकारत आहेस. त्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत? -खरोखर भारी वाटतेय. आता मला वाटतेय की मी याआधीच अशी भूमिका साकारायला हवी होती. परंतु 'देर आये दुरुस्त आये' असे म्हणता येईल. पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करताना एक वेगळेपण जाणवते. तो युनिफॉर्म चढविल्यावर आपोआप पॉवरफुल वाटू लागते. तसेच परिस्थिती हाताळताना स्फुरण चढते. मला तर मी स्त्री शक्ती ला रीप्रेझेंट करतेय अशी भावना आली. स्त्रिया सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट मध्ये देखील महिला पोलिसांची, अधिकाऱ्यांची संख्या वाढायला हवी.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

मला जेव्हा दहाडची कथा ऐकवली गेली तेव्हाच मी होकार कळवून टाकला होता. त्यानंतर संहिता वाचल्यावर आपला निर्णय चुकीचा नव्हता यावर शिक्कामोर्तब झाले. झोया अख्तर आणि रीमा काटगी यांनी जबरदस्त लिखाण केले आहे आणि त्यातील स्त्रीशक्ती साकारताना खूप ऊर्जामयी वाटले. खरंतर अश्या भूमिकेची मी वाट पाहत होते आणि ती संधी मला मिळाली याबद्दल मी झोया आणि रीमा ची आभारी आहे. या सक्षम आणि सर्जनशील महिलांसोबत काम करताना खूप शिकायला मिळालं.

दहाडच्या पडद्यामागील टीम मध्ये बऱ्याच महिला होत्या, हे अजून एका स्त्रीशक्तीचे उदाहरण. कारण सेटवर सर्व गोष्टी नेटकेपणाने व्हायच्या. माझ्यामते महिलांना लहानपणापासूनच शिकविले जाते की कुठलेही काम नेटकेपणाने करायचे, म्हणून आमच्या सेटवर कुठंही गडबड गोंधळ न होता कामाचा निपटारा होत होता. आम्हाला पोलीस मॅनरिझम्स शिकविण्यासाठी एका स्पेशल टीमला पाचारण केलं होतं. अगदी सलाम कसा ठोकावा यापासून आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकविल्या गेल्या. त्यातच एक भाषा तज्ञ सेटवर होता जो आम्हाला अस्सल पोलिसी उच्चार शिकवीत असे. मी स्वतः या भूमिकेशी कनेक्टेड आणि त्यात इंव्हेस्टेड राहिलेय.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

मला स्वतःला एक अनोखा अनुभव मिळाला. आम्हा अभिनेत्रींना मेकअप हा विक पॉइंट असतो. त्याच्याशिवाय कॅमेरा फेस करणे म्हणजे अशक्य वाटते. परंतु या सिरीज मध्ये मी मेकअप शिवाय काम केलंय. मी सेटवर आल्यावर रीमा स्वतः चेक करायची की मी मेकअप केला आहे की नाही. ती टिश्यू पेपर घेऊन माझ्या ओठांवर फिरवायची, हे बघायला की मी हलकीशी पण लिपस्टिक लावली आहे की नाही. टिश्यू पेपर कोरा निघाल्यावर ती संतुष्ट होऊन जायची. मी देखील निडरपणे मेकअप शिवाय कॅमेरा फेस केलाय. त्यामुळे माझ्यात एक अनोखा कॉन्फिडन्स आलाय.

अजून पुढे सांगायचं झालं तर मी दहाड मधील माझी व्यक्तिरेखा अंजली भाटी सोबत रीलेट करते. शक्यतो महिला अमुक अमुक काम करू शकत नाहीत अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळे त्यांना अवघड वा क्लिष्ट कामं दिली जात नाहीत. महिला सर्वकाही करू शकतात हे आमच्या या मालिकेतून सर्वांना समजेल. अंजली कोणाकडूनही बकवास ऐकून घेणारी नाहीये. यात एक जण तिला लेडी सिंघम म्हणतो तेव्हा तिला खूप राग येतो. एक महिला अधिकारी म्हणून तिला तो हिणविण्याचा प्रकार वाटतो आणि म्हणूनच ती त्वेषाने प्रतिक्रिया देते. मला सांगा, हीच लोकं एका पुरुष अधिकाऱ्याला सिंघम म्हणून चिडवतील का?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

तुम्ही बर्लीनेलला गेला होतात. तेथील अनुभव कसा होता?- आम्ही जर्मनी मध्ये होणाऱ्या बर्लीनेल फिल्म फेस्टीवल ला हजेरी लावली होती. तिथे दहाड दाखविला गेला. प्रत्यक्षात हा जगातील पहिलाच शो आहे जो या चित्रपट महोत्सवात दाखविला गेला. मी पहिल्यांदाच एखाद्या फिल्म फेस्टिवल ला हजेरी लावत होते. माझ्यासाठी हा अत्यंत सुखदायक आणि भावूक अनुभव होता. जागतिक चित्रपटांबद्दल माहिती मिळाली. अनेक उत्तम कलाकृतींचा आनंद घेता आला. दोन एपिसोड संपल्यावर तेथील जर्मन मंडळी विचारत होती की पुढील भाग कधी दाखवणार. मला विस्मयचकित करणारा हा अनुभव होता कारण भाषेचा अडसर झुगारून ही मंडळी आम्हाला दाद देत होती. माझ्यामते ही आपल्या देशासाठी गौरवपूर्ण घटना होती.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह इटीव्ही प्रतिनिधी किर्तीकुमार कदम

तू या सिरीज मध्ये महिला पोलीस अधिकारी साकारत आहेस. तुझा फिटनेस मंत्र काय आहे? -मी आठवड्यातून ४-५ दिवस वर्कआऊट करते. मी रोज कमीतकमी १०००० पावलं चालते. या क्षेत्रात फिट राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीत मी संयम राखते. माझ्या मते मन मारणे हे घातक आहे. त्यामुळे मी खाण्यावर जरी कंट्रोल ठेवत असले तरी सर्व काही खाते. परंतु मॉडरेशन खूप महत्त्वाचे आहे. ते मी वर्कआऊट मध्ये आणि खाण्यातही सांभाळते. महत्त्वाचे म्हणजे मी नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.




हेही वाचा -Pathaan Fever Grips Bangladesh : बांगलादेशमध्ये पठाणचा धुमाकुळ, झुमे जो पठाणवर थिरकले चाहते

ABOUT THE AUTHOR

...view details