मुंबई -Srimad Ramayan :साधारण तीन दशकांपूर्वी 'रामायण' छोट्या पडद्यावर प्रसारित झाले. तेव्हाच्या प्रेक्षकांनी त्या मालिकेला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलं होतं. त्यावेळी 'रामायण'ला पाहण्यासाठी लोक टीव्हीला हार घालून, पूजा करीत भक्तिभावानं या मालिकेचा आनंद घेत असत. आता पुन्हा एकदा रामायणाची गाथा छोट्या पडद्यावर अवतरत आहे. 'श्रीमद रामायण' ही मालिका नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या मालिकेबद्दल सध्या चर्चा होताना दिसत आहे. मालिकेचे निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत वार्तालाप करताना या मालिकेबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.
1 रामायण आताच का घेऊन येत आहात? :
रामायण हे सर्व पीढीतील लोकांना कळणे गरजेचे आहे. खरं म्हणजे गेली बरीच वर्षे माझ्या मनात होते की छोट्या पडद्यावर रामायण घेऊन यावं. भारतात युवा पिढीची संख्या जास्त आहे आणि या पिढीला रामायण आणि त्यातील शिकवण कळणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे. मला आपल्या महाकाव्यांबाबत आदर आहे. 2009 ला मी महाभारत आणलं होतं. हे महाकाव्य सर्व भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्यात आलं होतं. मला मालिका लांबवणे आवडत नाही. त्यामुळे आमचे महाभारत मी मर्यादित भागांपुरते ठेवले होते. त्याच सुमारास माझ्या मनात 'रामायण' या महाकाव्यावर मालिका करण्याचा विचार आला. त्यानंतर मी त्यावर रिसर्च केला, मी भरपूर वाचनही केलं. तरुण पिढीला आपली संस्कृती आणि इतिहास समजावून सांगण्यासाठी मला रामायण आणायचे होते. त्या सुमारास मी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे बिझनेस हेड नीरज व्यास यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला विचारले की मला काय बनवायचे आहे? मी स्पष्ट्पणे सांगितलं की, माझ्या या महाकथेत सामाजिक जडणघडणीचे चित्रण करणारा सखोल संदेश आहे आणि तो मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यानंतर त्यांना हे पटलं आणि आम्ही 'श्रीमद रामायण'च्या निर्मितीला सुरुवात केली.
2 रामायण सर्वांच्या परिचयाचे आहे. तुमच्या या रामायणात वेगळेपण काय असणार आहे? :
आधी सांगितल्याप्रमाणे मी रामायणावर भरपूर अभ्यास करीत होतो. माझी लेखकांची टीमही त्या विषयावर बारीक संशोधन करीत होती. मी या प्रोजेक्टवर, सुमारे 8-9 महिन्यांपासून काम करत आहे. मला हे 'रामायण' मोठ्या स्केलवर दाखवायचे आहे. हल्ली झालेल्या तांत्रिक विकासांचा आम्हाला फायदा होईल. आम्ही आमच्या पद्धतीनं कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही अनावश्यक सिनेमॅटिक लिबर्टी घेणार नाही. तसेच काहीही अवाजवी दाखविणार नाही. हे 'श्रीमद रामायण' बघितल्यावर प्रेक्षकांना आपल्या भूतकाळाचा गौरव वाटेल, अभिमान वाटेल.
3 तुम्हाला पौराणिक कथानकं आवडतात असे दिसते. तुम्ही स्वतः किती धार्मिक आहात? :
आम्ही उत्तरेकडचे आहोत. माझे वडील कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यामुळे आमचे संगोपन पूर्वेकडील प्रांतात झाले. मात्र माझ्या घरी उत्तरेकडील घरात जसं वातावरण असते तसं आहे. पूजापाठ वगैरे घरी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे, माझ्या धार्मिक गोष्टीचा प्रभाव आहे. मनोरंजन क्षेत्रात मी करियर करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. परंतु 'महाभारत' केल्यानंतर 'रामायण' करावे असं माझ्या मनात आलं. माझ्या धार्मिकतेबद्दल बोलायचं झालं तर मी इतकेच म्हणेन की मी आरशात बघताना माझे प्रतिबिंब धूसर दिसता कामा नये, हा माझा अट्टाहास असतो. माझे विचार शुद्ध असले पाहिजेत, असं माझं मत आहे. जर मी काही चुकीचे केले तर ते धुरकटपणे प्रतिबिंबित होईल.
4 हल्लीच रामायणावर आधारित एक चित्रपट येऊन गेला ज्यावर प्रचंड टीका झाली. तुमच्या रामायणावर प्रश्नचिन्ह उभे राहू नये म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेतली आहे? :
खूप चांगला प्रश्न आहे. ही महाकथा आम्हाला जबाबदारीनं राष्ट्राला सांगायची आहे. आमचे ग्राउंडवर्क उत्तम आहे. आमच्याकडे रिसर्च टीम आहे तसेच लेखकांची टीम खूप चांगली आहे. आमचे सर्व संदर्भ तथ्यात्मक लिखित आधारावरून घेतलेले आहेत. आम्ही अनावश्यक सिनेमॅटिक गोष्टी घेणार नाही. आम्ही पुरातन ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या गोष्टी मिळवत आहोत. अर्थातच तंत्रज्ञानाची प्रगती कथा चांगल्या प्रकारे सांगण्यास मदत करेल.
5 तुम्ही कलाकारांची निवड कशी केली? श्रीमद रामायण कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? :
'श्रीमद रामायण' हे महाकाव्य आहे. ही एक मोठी निर्मिती आहे आणि मोठ्या आणि छोट्या भूमिका करण्यासाठी सुमारे 150 पात्रांची निवड केली गेली आहे. अर्थात हे काम अवघड होतं, पण माझ्या टीमनं अथक परिश्रम घेऊन हे काम पार पडलं आहे. मी स्वतः काही ऑडिशन्स घेतल्या व अंतिम निर्णयासाठी कास्टिंग टीमकडे शिफारस केली. माझ्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे जो तो कलाकार विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी किती उत्साही आहे, हे जाणून घेणे. ते पात्रात पवित्रपणा कसा आणि किती आणतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मला आपल्या संस्कृतीची आवड आहे आणि पौराणिक कथा हे एक मिथक आहे, यावर मी विश्वास ठेवत नाही. माझ्यामते हा भारतीय इतिहास आहे. परताव्याची चिंता न करता माझे काम प्रभावीपणे करण्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतःकडून माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम काम करण्याची अपेक्षा करतो. मला माझे कथाकथन नेहमीच चांगले असेल यावर भर द्यायचा आहे.
हेही वाचा :
- अमिताभ बच्चन यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी केबीसीच्या सेटला दिला अखेरचा निरोप
- आलिया भट्टनं 2023 वर्षातील कामगिरीचा व्हिडिओ केला शेअर
- अमिताभ बच्चन यांनी वॉर्नर म्युझिक इंडिया कंपनीला पाच वर्षांसाठी भाड्यानं दिली 'ही' मालमत्ता