मुंबई - मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक हिंसक घटना घडल्या. याबद्दल संपूर्ण देशभर चिंतेचे वातावरण असताना दोन आदिवासी महिलांना हिंस्त्र जमावाने लैंगिक छळ करत, त्यांची विवस्त्र मिरवणूक काढण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृतीची देशभर निंदा होत आहे. यानंतर संतापाची लाट देशभर सर्व क्षेत्रातील लोकांच्यामध्ये पसरली. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींना यावर टीका केली व त्या महिल्यांना न्याय देण्याची व आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. मात्र अनेक सेलेब्रिटी अभिनेत्रींनी यावर भाष्य करण्याचे टाळले आहे, यात अभिनेत्री कंगना रणौतचाही समावेश आहे.
कंगना रणौतही नेहमी सडेतोड भूमिका घेण्यासाठी ओळखली जाते. ती राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयावर आपली बिनधास्त मते मांडत असते. परंतु, मणिपूर लैंगिक अत्याचाराबाबत तिने अद्याप आपले मौन सोडलेले नाही. नेमके यावर भोजपूरी गायिका नेहा सिंग राठोडने सवाल उपस्थित केला आहे. तिने ट्विटरवर एक पोस्टमध्ये काही प्रश्न विचारले आहेत. तिने हे प्रश्न हिंदीत विचारले आहेत. त्याचा मराठी अनुवाद असा आहे की, 'दीपिकाने एक भगवी बिकीनी परिधान केल्यावर पूर्ण भारतीय संस्कृती आणि घर्म धोक्यात आला होता. परंतु, जेव्हा गर्दाने आदिवासी मुलींना निर्वस्त्र करुन फिरवले तेव्हा जसे काही घडलेच नाही. कुठं गेला तो महिला मोर्चा जो पुतळे जाळत होता? कुठे गेले ते भाट, दरबारी कवी आणि गायक जे उत्तरासाठी व्याकुळ झाले होते? सरकारला मी विचारलेल्या प्रश्नांना उडवून लावणाऱ्या गायिका कुठल्या बिळात लपल्या आहे? आजकाल कंगनाजीही मूग गिळून गप्प आहेत! असं काय घडलं ! महिलांच्या अधिकारावर भाष्य करणार नाही का आता?'
तिने एक व्हिडिओ शेअर करुन राज्यकर्त्यांवरही भरपूर टीका करत, 'बेटी पढाओ बेटी पढाओचा नारा' कुठे गेला? असा सवालही तिने केला आहे. तिने देशाच्या महिला आयोगावरही शांत राहिल्याबद्दल तिने टीका केली आहे. यानंतर यावर तिने एक लोकगीताच्या दोन ओळी गायल्या त्याचा अर्थ असा आहे, 'इज्जती लुटल्या जात असताना ही तुमची कसली चौकीदारी सुरू आहे?'