मुंबई- Dharmendra birthday : बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र आज आपला 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्तानं फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी, चाहते आणि कुटुंबीयांकडून त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होतोय. त्यांची लाडकी लेक ईशा देओलनं एक पोस्ट लिहून त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या. ईशाने इंस्टाग्रामवर या खास दिवशी वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत धर्मेंद्र ईशाच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहेत. ईशानं वडिलांसोबतचे सोफ्यावर बसलेले तीन फोटो शेअर केले आहेत. यात धर्मेंद्र आपल्या मुलीला प्रेमानं गोंजारताना दिसतात. दोघेही कॅमेऱ्याला हसत पोज देताना दिसत आहेत.
फोटो शेअर करत तिने लिहिलं, "माझ्या डार्लिंग पापाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.. तुम्ही नेहमी आनंदी, निरोगी आणि मजबूत रहावे अशी मी प्रार्थना करते." पोस्ट अपलोड झाल्यानंतर ईशाच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशाचा भाऊ बॉबी देओलने रेड हार्ट इमोजी टाकला आहे.
धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अॅक्शन हिरोपैकी एक मानले जातात. म्हणूनच त्यांना बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणूनही ओळखले जाते. 'शोले', 'प्रतिज्ञा', 'द बर्निंग ट्रेन' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. धर्मेंद्र या वयातही रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसतात. अलीकडेच त्यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्यांच्याकडे शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा आगामी अद्याप शीर्षक न ठरलेला रोमँटिक चित्रपटही आहे.