लग्न हा प्रत्येक कुटुंबातील हृद्य सोहळा. त्यात मुलीचे लग्न असेल तर अजूनच हृदयस्पर्शी. अशीच घालमेल प्रेक्षकांना अमुभायला मिळेल 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून. माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून समोर आली आहे. 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' हृदयस्पर्शी गाणे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतंय. यंदाच्या लग्नसराईत नक्की वाजेल असं 'बकुळा' या गाण्याला गायक नंदेश उमप यांनी स्वरसाज चढवलाय.
लग्नसराई म्हटलं की लगीनगीतांशिवाय शोभा येतच नाही. लगीनगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी 'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे.
डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप, प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी गायले असून हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 'बकुळा' या गाणयातून अलवार नाते गोंजारले जात असून हृदयस्पर्शी असे या गीताचे बोल सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.