मुंबई - बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता बनल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेला एल्विश यादव पुन्हा एकदा विचित्र कारणासाठी चर्चेत आला आहे. रेव्ह पार्ट्या आयोजित करून त्यात सापाचे विष वापरल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. एल्विश यादवच्या एफआयआरसोबतच रेव्ह पार्टीही चर्चेचा विषय बनलीय. आज जाणून घेऊया की रेव्ह पार्ट्या अशाच होत्या की त्याची संस्कृती काळानुसार बदललीय.
रेव्ह पार्टी म्हणजे काय? - रेव्ह पार्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक म्युझिकसह डान्सचा समावेश होतो. 80-90 च्या दशकाच्या उत्तरार्धात रेव्ह पार्टी संस्कृतीचा उदय झाला. मुळात वेगवान संगीत अशा पार्टीत वाजवले जाते. या पार्ट्या गुप्त ठिकाणी भूमिगत पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर होतात. याला साधारणपणे रेव्स म्हणतात, रेव्हमध्ये हजारो लोक नाचण्यासाठी आणि इलेक्ट्रिक संगीताचा आनंद घेण्यासाठी गोळा होतात. इलेक्ट्रॉनिक संगीतामध्ये टेक्नो, हाऊस, ब्रेकबीट आणि ट्रान्स यांचा समावेश असतो.
अशी झाली रेव्ह संस्कृतीची सुरुवात - 1980 मध्ये युनायटेड किंगडममध्ये EDM (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) स्वरूपात रेव्ह पार्ट्यांची सुरुवात रेव्ह संगीताने झाली. रेव्ह हा शब्द मुळात अंडरग्राउंड क्लबमध्ये रात्रभर आयोजित केलेल्या पार्टीच्या संदर्भात आहे. या पार्ट्यांचं आयोजन भरपूर एनर्जी, झिंग आणणारं वेगवान संगीत आणि आंदासाठी ड्रग्जचा वापर यासाठी केलं जायचं. संगीतासोबतच रेव्ह संस्कृतीत रंगबिरंगी परफॉर्मन्स आणि समुह नृत्य यासाठीही ओळखली जाते.
रेव्ह पार्टीचा नकारात्मक परिणाम - रेव्ह पार्टीची संस्कृती एकत्र जमून संगीत आणि नृत्याचा आनंद लुटणे अशी होती. मात्र गेल्या काही वर्षांत रेव्ह संस्कृतीचा समाजावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम झालाय. रेव्ह पार्टीचा सकारात्मक परिणाम असा झाला की त्यांनी लोकांना एकत्र आणले. यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची आणि आनंद लुटल्याची भावना निर्माण झाली, मात्र दुसरीकडे या पार्ट्यांमध्ये नशा आणि अंमली पदार्थांचा वापर करून काही लोकांनी याला बदनाम केलंय. काही लोक रेव्ह पार्टी आवश्यक असल्याचं मानतात, ते म्हणतात की त्याशिवाय रेव्ह अपूर्ण आहे परंतु काही लोक याच्या विरोधात आहेत, ते मानतात की हा पार्टी फॉरमॅट आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जातो आणि त्याचे परिणाम देखील भयानक असू शकतात.