नोएडा - Elvish Yadav Snake Venom Case : युट्युबर एल्विश यादव आरोपी असलेल्या सापाच्या विष प्रकरणाचा तपास करणार्या नोएडा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकाला या कामातून मुक्त करण्यात आलंय. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उपनिरीक्षक संदीप चौधरी हे नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्याचे प्रभारी होते आणि आता त्यांची पोलीस लाईन्समध्ये बदली करण्यात आली आहे.
एल्विश विरोधात एफआयआर, स्टेशन प्रभारीची उचलबांगडी - पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरल्यामुळे नोएडा सेक्टर-49 पोलीस स्टेशनचे प्रभारी यांची राखीव पोलिस लाईनमध्ये बदली करण्यात आली आहे, असे पोलिस प्रवक्त्याने रविवारी रात्री सांगितले. नोएडा पोलिसांनी वाइल्डलाइफ (संरक्षण) कायदा आणि भारतीय कायद्याच्या तरतुदींनुसार रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याबद्दल युट्युबर आणि रिअॅलिटी ओटीटी शो बिग बॉसचा विजेता एल्विश यादव याच्यासह सहा व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
एल्विशच्या कथित पाच साथीदारांना अटक - या प्रकरणी 3 नोव्हेंबर रोजी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती, तर एका बँक्वेट हॉलमधून पाच कोब्रासह नऊ सापांची सुटका करण्यात आली होती, आरोपींच्या ताब्यातून 20 मिली संशयित सापाचे विष जप्त करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात एल्विश यादवची भूमिका काय होती याचा तपास पोलीस करत आहेत. 3 नोव्हेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींमध्ये तो घटनास्थळी नव्हता.
भाजप नेत्या मनेका गांधी यांची भूमिका- २६ वर्षीय युट्युबरएल्विश यादवने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत आणि पोलिस तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. प्राणी हक्क गट पीएफए (पीपल फॉर अॅनिमल्स) च्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएफएच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांनी एल्विश यादववर बेकायदेशीरपणे सापाच्या विषाची विक्री केल्याचा आरोप केला आहे आणि त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.