मुंबई- ओटीटी प्लॅटफॉर्मस् वर विविधांगी आणि विविध भाषांमधील कंटेंट उपलब्ध आहे. सध्या अनेक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मस् उघडले गेले असून त्यावर बहुभाषिक वेब सिरीज बनविल्या जात आहेत. हल्लीच डिजिटल मार्केटमध्ये उतरलेले जिओ स्टुडिओज आपली पहिली मराठी वेबसिरीज घेऊन येत आहेत ज्याचे नाव आहे, 'एका काळेचे मणी'. या वेब सिरीजमध्ये प्रशांत दामले, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे, पौर्णिमा मनोहर, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर सारख्या तगड्या कलाकारांची फौज असून ती प्रदर्शनास सज्ज झाली आहे.
'एका काळेचे मणी' या वेब सिरीजची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली असून या कौटुंबिक कॉमेडी वेबसिरीज साठी ते आणि जिओ स्टुडिओज एकत्र आले आहेत. या सिरीजची गोष्ट मध्यमवर्गीय काळे कुटुंबाची असून ज्यात आई, बाप, मुलगी, मुलगा असून त्यांच्या शेजाऱ्यांना आपल्या मुलीचं लग्न काळे कुटुंबात करून द्यायचं आहे. यातील बाप घरातील कर्ता पुरुष म्हणून म्हणवून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहे. यातील आई सतत आपल्या मुलांच्या लग्नाविषयी विचार करताना दिसते. यातील मुलगी प्राणीप्रेमी असून तिला पाळीव प्राण्यांसाठी डिझाईनर कपडे बनवायचे आहेत आणि त्यासाठी व्यवसाय करून एक ब्रँड बनवायचा आहे. यातील मुलगा डॉक्टर आहे. तो आयरर्लंडमधून पीएचडी करत आहे. आता हे झाले अतरंगी काळे कुटुंब. परंतु या अतरंगी कुटुंबाचे शेजारी सुद्धा महा अतरंगी आहेत.
निर्माते महेश मांजरेकर म्हणाले की, 'मला एक हलका फुलका शो करण्याची इच्छा होती. एक कौटबिक मनोरंजन करणारा शो करण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून मनात रुंजी घालत होती. मला स्वतःला हलके फुलके फॅमिली शोज आवडतात. जेव्हा 'एका काळेचे मणी' चे लिखाण समोर आले तेव्हा विक्षिप्त आणि चमत्कारिक फॅमिलीचा विनोदी शो होईल याची खात्री पटली होती. लीड रोलमध्ये प्रशांत दामले यांनी काम करण्यास होकार दिला तेव्हा आनंद झाला आणि हुरूप वाढला. प्रशांत दामले नंतर विशाखा सुभेदार, समीर चौगुले, पौर्णिमा मनोहर, ऋतुराज शिंदे, ऋषी मनोहर, इशा केसकर, आणि वंदना गुप्ते असे विनोदी सुपरस्टार्स या मालिकेला लाभले आणि अप्रतिम सिरीज बनणार हे कळून चुकले. आता ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांना घर बसल्या एक छान हलका फुलका, निखळ करमणूक करणारा आणि कौटुंबिक विनोदी शो बघायला मिळेल याची ग्वाही मी देतो.'
'एका काळेचे मणी' ही एक भन्नाट विनोदाने नटलेली, जबरदस्त डायलॉग बाजी असलेली वेबसिरीज असून तिचे दिग्दर्शन केले आहे अतुल केतकर यांनी. या वेब सिरीजची संकल्पना ऋषी मनोहर ची असून ती ओम भूतकर याने लिहिली आहे. याची निर्मिती महेश मांजरेकर, रुतुराज शिंदे, ऋषी मनोहर आणि जियो स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे यांनी केली असून जिओ स्टुडिओज ने प्रस्तुती केली आहे.