मुंबई - 2 नोव्हेंबर हा दिवस देशभरातील शाहरुखच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे. एक म्हणजे आज 'किंग खान'चा वाढदिवस आहे आणि त्यामुळं उत्साहाचं एक वेगळं वारं फॅन्समध्ये संचारणं हे एखाद्या सणाच्या आनंदाइतकंच आहे. त्यावर सोने पे सुहागा म्हणजे त्याच्या राजकुमार हिराणीसोबतच्या पहिल्या 'डंकी' चित्रपटाच्या टीझरही रिलीज झालाय. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'डंकी'मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त 'डंकी'त तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, सतीश शाह आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राजकुमार हिराणी दिग्दर्शित शाहरुख खानचा आगामी 'डंकी' या चित्रपटाच्या पहिल्या झलकेची चाहत्यांनी आतुरतेने वाट पाहिलीय. हे वर्ष शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक रोमांचक प्रवास ठरलंय. कारण चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर किंग खाननं एकाच वर्षात दोन सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ख्रिसमसच्या दिवशी 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'डंकी' चित्रपटचा आज टीझर रिलीज झाला आणि चाहत्यांना वेड लागणं बाकी राहिलंय.
'डंकी'च्या टीझर नंतर शाहरुखच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही. 'तुम्ही एकवेळ बॉलिवूडला दुर्लक्षित करु शकता पंरतु शाहरुख आणि राजकुमार हिराणीच्या प्रतिभेला नाही', असं एकानं म्हटलंय. 'शाहरुख खान पूर्णपणे आपल्या भावनांशी निगडीत आहे आणि ही काही सोपी गोष्ट नाही.. आपल्या आई-वडिलांच्या काळापासून ते आता आपल्या हृदयावर राज्य करत आहे..तो सम्राट आहे..आमच्या हृदयाचा राजा जो गेली अनेक दशके आपले मनोरंजन करत आहे.', असं एका नव्या पिढीच्या चाहत्यानं म्हटलंय.
'एक अनिवासी भारतीय या नात्याने, तुमच्या चित्रपटांनी माझी ओळख निर्माण करण्यात आणि माझा भारतीय वारसा अभिमानाने व्यक्त करण्यास मला मदत केली आहे. एखाद्याला शाहरुख खानचे चित्रपट सुचवणं हे प्रेम, अभिमान आणि माझ्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले प्रतीक देण्यासारखं आहे.', असे एका एनआरआय चाहत्यानं लिहिलंय.