मुंबई- Dunki day 1 box office prediction : शाहरुख खानचा 'डंकी' गुरुवारी रिलीज झाल्यामुळे, शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाची तुलना यावर्षी रिलीज झालेल्या त्याच्या 'जवान' आणि 'पठाणशी' करत आहेत. फिल्म व्यापार विश्लेषकांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोसाठी प्रेक्षकांची क्रेझ आणि परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आगाऊ बुकिंगमधील सध्याचा ट्रेंड तपासला जातोय. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'डंकी'ची सुरुवात सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांपासून होणं अपेक्षित आहे.
'डंकी' चित्रपट भारतात सुमारे 4000 स्क्रीन्सवर पहिल्या दिवशी 15000 हून अधिक शोसह रिलीज झालाय. 'डंकी'ला पहिल्या दिवशी मिळत असलेला प्रतिसाद पाहता अपेक्षित गल्ला जमण्याची आशा आहे. 'डंकी'साठी सध्या दोन महत्त्वाची टारगेट आहेत पहिलं म्हणजे राजकुमार हिराणीच्या 'पीके'च्या पहिल्या दिवशाचे कलेक्शन (26 कोटी)ला मागे टाकणे आणि नंतर 'संजू'च्या पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या ( 34.25 कोटी) जवळ जाण्यासाठी प्रयत्न करणे.
'डंकी'चे अॅडव्हान्स बुकिंगला शनिवारी सुरुवात झाली आणि त्याला साकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. पहिल्याच दिवशी 5,58,766 तिकिटांची विक्री टॉप 3 राष्ट्रीय साखळी असलेल्या पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसच्या माध्यमातून झाली आहे. राजकुार हिराणी आणि शाहरुखच्या या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचं अॅडव्हान्स बुकिंग 15.41 कोटी रुपयांचे झाले आहे.