मुंबई - Dunki first reactions out: शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटाची प्रतीक्षा संपली आणि पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी देशभर चित्रपटगृहाच्या बाहेर किंग खानच्या चाहत्यांनी गर्दी केली. मुंबईत पहिला शो पहाटे 5 वाजून 55 मिनीटांनी वाजत गाजत पार पडला. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर अमाप उत्साह दिसत होता. शाहरुखच्या फॅन क्लबने अनेक व्हिडिओ शेअर केलेत. यामध्ये लोकांचा मोठा जमाव ढोलाच्या तालावर नाचताना आणि 'डंकी'च्या रिलीजला सुरुवात करण्यासाठी फटाके वाजवताना दिसत आहे.
थिएटर्सच्या बाहेर मोठे कटआउट देखील पाहायला मिळत आहेत. चाहत्यांचा हा उत्साह पाहून शाहरुख खानही भारावून गेलाय आणि त्याने एक्स हँडलवरुन सर्वांचे आभार मानले आहेत. 'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले असून त्यात तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत.
'डंकी'चे लेखन अभिजात जोशी, राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. मनू, सुखी, बुग्गू आणि बल्ली या चार मित्रांची ही हृदयस्पर्शी गोष्ट आहे. हे चौघेही चांगल्या आयुष्यासाठी लंडनमध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक कठीण परंतु जीवन बदलणारा प्रवास करावा लागतो.
शाहरुखच्या एका कलंदर चाहत्यानं एक अतरंगी गोष्ट करत थिएटरमधून 'डंकी' चित्रपट थेट लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याचे हे स्ट्रिमिंग 50 मिनीटे सुरू होते. या स्ट्रमिंग 1 लाख 30 हजार लोकांनी पाहिले आहे. आता हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे.