मुंबई- या वर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या 'पठाण' आणि 'जवान'च्या यशानंतर, शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अडखळत असल्याचे दिसत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आशादायक सुरुवात करूनही, चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
गुरुवारी चांगली सलामी दिल्यानंतर 'डंकी'ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यात घट अनुभवली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने शुक्रवारी 20.50 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दोन दिवसांचा विचार करता भारतात या चित्रपटाने एकूण 49.7 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या पूर्वी रिलीज झालेल्या शाहरुख स्टारर 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अनुक्रमे 57 कोटी आणि 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'डंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा रिलीज आहे.
दरम्यान, शुक्रवारी खानची पत्नी गौरीने चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अपडेट शेअर केली आहे. तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, "जगभरात प्रेम जिंकत आहे! जगभरात 58 कोटी ग्लोबल बॉक्स ऑफिस कलेक्शन." गौरी खान 'डंकी' चित्रपटाची सहनिर्मातीही आहे. तिने 'डंकी' थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे आवाहनही प्रेक्षकांना केलं आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार 'डंकी'ने शुक्रवारी अपेक्षेहून कमी कमाई केली. प्रशांत नील दिग्दर्शित प्रभास स्टारर 'सालार'च्या रिलीजने एसआरकेच्या चित्रपटाच्या कलेक्शनवर लक्षणीय परिणाम केल्याचे दिसते. याउलट, 'सालार'ने देशांतर्गत बाजारपेठेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांसारख्या स्टार्सच्या या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत सर्व भाषांमध्ये 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी नमूद केले की, 'सालार' आणि 'डंकी' या दोन्ही चित्रपटांनी मलेशियातील वीकेंड टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. 'सालार'ने ख्रिसमसच्या वीकेंडसाठी उत्तर अमेरिकेतील टॉप 5 मध्ये पदार्पण केले, तर या सणासुदीच्या हंगामात प्रेक्षकांनी निवडलेल्या टॉप 10 चित्रपटांमध्ये 'डंकी'ला स्थान मिळाले आहे.
प्रभास स्टारर 'सालार'च्या कठीण स्पर्धेविरुद्ध 'डंकी' सुरुवातीच्या वीकेंडमध्ये सावरेल का, हा प्रश्न कायम आहे. 'डंकी' हा शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा पहिला एकत्रित चित्रपट आहे. तर 'सालार' चित्रपटासाठी प्रभास आणि प्रशांत नील पहिल्यांदा एकत्र आले आहेत.
हेही वाचा -
- यंदाच्या ऑस्कर शर्यतीत एकही भारतीय चित्रपट नाही, '2018' च्या दिग्दर्शकाने मागितली प्रेक्षकांची माफी
- 'कल्कि 2898' एडी ते 'पुष्पा 2' पर्यंत हे 10 साऊथ चित्रपट 2024 मध्ये होईल प्रदर्शित
- ऑस्कर शर्यतीत एकही भारतीय चित्रपट नाही, '2018' च्या दिग्दर्शकाने मागितली प्रेक्षकांची माफी