मुंबई - Dunki Box Office collection day 1 : राजकुमार हिराणी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'डंकी' चित्रपटाची गुरुवारी जोरदार सुरुवात झाली. या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि फिल्म ट्रेड पंडितांना कमाईचे अपेक्षित आकडे मिळाले नाहीत. शाहरुख खानच्या जबरदस्त हिट ठरलेल्या 'जवान' आणि 'पठाण' चित्रपटाच्या तुलनेत हे आकडे कमी आहेत. प्रेक्षकांनी सकाळपासूनच थिएटर बाहेर रांगा लावल्यानं चित्रपटाची धुमधडाक्यात सुरुवात झाली. 'डंकी'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटी कमाई केली आहे.
'डंकी'च्या पहिल्या दिवसाचे कमाईचे आकडे इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने जारी केले आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपटाने गुरुवारी सर्व भाषांमध्ये 30 कोटी रुपये जमा केले. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची एकूण व्याप्ती 25.71% होती. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की शाहरुखचे चित्रपटाला ज्या शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता तितका पाहायला मिळाला नाही. मात्र शाहरुख स्टारर या चित्रपटानं हैदराबादमध्ये आपले पाय रोवले. यापूर्वीच्या चित्रपटानेही येथे चांगली कामगिरी केली होती.
सुरुवातीच्या दिवसाच्या आकडेवारीनुसार सनी देओल स्टारर 'गदर 2', शाहरुख स्टारर 'पठाण' आणि 'जवान' आणि अलिकडेच रिलीज झालेल्या रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल'च्या पहिल्या दिवशीच्या कमाई 'डंकी'पेक्षा जास्त होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'ने पहिल्याच दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. 'जवान'ने 'पठाण'चा विक्रम मोडत 74.50 कोटींची कमाई केली होती. संगी रेड्डी वंगाच्या 'अॅनिमल'नं पहिल्या दिवशी 63 कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली होती, तर सनी देओलच्या 'गदर 2' ने 40.1 कोटी रुपयांसह थिएटरमध्ये पदार्पण केले होते.
आज शुक्रवार २२ डिसेंबर रोजी प्रशांत नील दिग्दर्शित आणि प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या भूमिका असलेला 'सालार' हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'डंकी'सोबत लढत होणार आहे. अशावेळी 'डंकी' कशी वाटचाल करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.