मुंबई - Dunki movie : शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन चित्रपटांनी रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली. आता बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वादळ निर्माण करण्यासाठी किंग खान हा 'डंकी' चित्रपट घेऊन येत आहे. 'पठाण' आणि 'जवान' प्रमाणेच शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची वाट पाहात आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डंकी' हा चित्रपट जगभरात हिट करून 2023 वर्ष संपवण्याचा विचार किंग खान करत आहे. नुकताच 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता वाढली आहे.
'डंकी'चं अॅडव्हान्स बुकिंग : 'डंकी' चित्रपटाची निर्मिती 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', '3 इडियट्स' आणि 'पीके' फेम दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केली आहे. 'डंकी'कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. यशराज फिल्म्सनं आता 'डंकी' चित्रपटाबाबत आगाऊ बुकिंगशी संबंधित एक माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे माहिती दिली की, परदेशात 'डंकी' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग सुरू झालं आहे. परदेशात अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर आता शाहरुख खानच्या चाहत्यांना देशात कधी अॅडव्हान्स बुकिंग होणार याबद्दल उत्सुकता आहे. 'डंकी'चं आगाऊ बुकिंग भारतात 14 डिसेंबरपासून सुरू होऊ शकतं.