मुंबई- अभिनेता शाहरुख खानने गुरुवारी दुल्कर सलमानच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'किंग ऑफ कोठा' चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरचे लॉन्चिंग केले. हा एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट असून दुल्कार सलमान आक्रमक अँग्री यंग मॅनच्या रुपात झळकला आहे.
ट्विटरवर शाहरुख खानने लिहिले की, ' 'किंग ऑफ कोठा'चा ट्रेलर प्रभावी बनला आहे, यासाठी दुल्कर सलमानचे अभिनंदन! चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुला भरपूर प्रेमासह संपूर्ण टीमला मोठ्या यशासाठी शुभेच्छा!' 'किंग ऑफ कोठा'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी शाहरुख खानसह साऊथ सुपरस्टार मोहनलाल, सुर्या आणि नागार्जुन यांनी खास उपस्थिती दर्शवली होती.
एक गँगस्टर आणि हाय ऑक्टेन अॅक्शन ड्रामा म्हणून ओळखल्या जाणार्या, 'किंग ऑफ कोठा' चित्रपटात दुल्कर सलमान मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलर पाहताना पडद्यावरील थरार खुर्चीला खिळवून ठेवण्यात ट्रेलर यशस्वी झाल्याचे जाणवते. वेगवान अॅक्शन, ताल धरायला लावणारी गाणी आणि दुल्करचा रांगडेपणा यामुळे ट्रेलर रंजक बनला आहे. हा चित्रपट अभिलाष जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यावर्षी २४ऑगस्ट २०२३ रोजी ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. पॅन इंडिया असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होईल.
दरम्यान, दुल्कर 'गन्स अँड गुलाब्स' या आगामी वेब सिरीजमधून ओटीटीवर डिजिटल पदार्पण देखील करणार आहे. या मालिकेत राजकुमार राव आणि गुलशन देवय्या यांच्याही मुख्य भूमिका आहेत. राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका १८ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर खास स्ट्रीम होईल. गुलाबगंज नावाच्या शहरात घडणारी ही कथा ९० च्या दशकातील गँगस्टर आणि बॉलिवूड स्टाईलच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आली आहे. 'गन्स आणि गुलाब्स' मालिकेत ९० च्या दशकातील जग सिनेमास्कोपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शक्ती आणि युक्तीचा संघर्ष विनोदी पद्धतीने मांडण्यात आला आहे. यात एक रंजक प्रेमकहानीही पाहायला मिळणार आहे.