मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आल्याबरोबरच खूप धमाल केली आहे. 'ड्रीम गर्ल 2'च्या 'पूजा'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'पूजा'ची जादू बॉक्स ऑफिसवर सध्या चालताना दिसत आहे. 'ड्रीम गर्ल 2'चा ओपनिंग वीकेंड शानदार होता. या चित्रपटाने 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान आता आयुष्मान खुरानाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल 2'हा चित्रपट सोमवार बॉक्स ऑफिसवर किती नोटा कमवू शकतो, हे जाणून घेऊया....
'ड्रीम गर्ल 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन :'ड्रीम गर्ल 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 10.69 कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी 14.02 कोटी कमाविले. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16 कोटीचा व्यवसाय केला. दरम्यान आता चौथ्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 5 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 45.71 कोटी रुपये होईल. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 50 कोटीचा टप्पा ओलांडेल असे सध्या दिसत आहे. आयुष्मान खुरानाने बऱ्याच दिवसानंतर या चित्रपटाद्वारे कम बॅक केला आहे. यापूर्वी आयुष्मानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाहिजे तशी कमाई केली नाही, त्यामुळे सध्या त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे.