मुंबई - Biography of Dr Babasaheb Ambedkar : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. परंतु त्यांची ओळख त्याहीपलीकडील आहे. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक सुद्धा होते. त्यांनी अनुभवलेले सामाजिक भेदभाव भविष्यातील दलित समाजाला भोगावे लागू नयेत, म्हणून भारतीय घटनेत त्यांना समान वागणूक मिळेल याची व्यवस्था केली. पण प्रस्थापित राजकारण्यांनी तसं घडू दिलं नाही आणि त्यामुळे आजही आपल्या समाजात आजही जातीय मतभेद अस्तित्वात आहेत. आंबेडकरांनी दलित बौद्ध लोकांविरोधात होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसंच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचं समर्थन केलं. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. आजवर त्यांच्या जीवनावर आधारित नाटके, मालिका, चित्रपट बनले आहेत. त्यात एक भर पडत आहे ती म्हणजे 'जय भीम एका महानायकाची गाथा' या नव्या मालिकेची. ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
संविधानातील दलित समाजाला मूलभूत आणि शिक्षणाच्या हक्कांचा अधिकार देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर 'राज्यघटनेचे शिल्पकार' म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी केली होती समाजाच्या परिवर्तनासाठी अतोनात प्रयत्न केले. अशा या महानायकाच्या जीवनाची कहाणी 'जय भीम एका महानायकाची गाथा' या मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य उलगडणार आहे तसेच त्यांचा जीवनपट नव्याने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध तसेच
स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या योगदानाबद्दल या मालिकेतून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधानाचा पाया देण्यासाठी केलेला अभ्यास आणि दलित समाजाच्या उध्दारासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम यांचा मालिका वेध घेईल. त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यावरही ही मालिका प्रकाश टाकेल.
'जय भीम… एका महानायकाची गाथा' ही मालिका येत्या २५ सप्टेंबर पासून झी मराठी वाहिनीवर, सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता, प्रसारित होणार आहे.