मुंबई - 'चार्ली चोप्रा' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. शोच्या पोस्टरचे लॉनिचिंगसह निर्मात्यांनी पायलट भागाचे विशेष पूर्वावलोकन केले. इन्स्टाग्रामवर सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मने पोस्टर शेअर केले. याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, 'एका थंडगार रहस्याचा उलगडा होण्याचे साक्षीदार व्हा. सादर करत आहे चार्ली चोप्रा. टस्क टेली फिल्म्स आणि अगॅथा क्रिस्टी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा शो आहे. एक विशेष पायलट प्रीव्ह्यू भाग, आता सोनी लिव्हवर प्रवाहित होत आहे. या नवीन सोनी लिव्ह ओरिजनलसाठी सह-तयार करण्याची संधी गमावू नका.'
निर्मात्यांनी त्याच्या मूळ डिटेक्टिव्ह थ्रिलरचे पायलट भाग पूर्वावलोकन देखील जारी केले आहे. अगॅथा क्रिस्टीच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित, या मालिकेचे दिग्दर्शन, सहनिर्मिती आणि सह-लेखन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. भारद्वाज सोबत या शोचे लेखन अंजुम राजाबली आणि ज्योत्स्ना हरिहरन यांनी केले आहे. एका गुढ म्यूझिकसह हे पोस्टर उलगडत जाते. 'तुफानी रात में एक कत्ल, पर कातील कौन? कोई अपना, पराया या अननोन?' असे पोस्टरवरील टेक्स्ट आपल्याला कथेबद्दलची उत्सुकता ताणवतात. अगॅस्था क्रिस्टीच्या सत्यकथेवर आधारित याची कथा असल्याचे मोशन पोस्टरवर म्हटलंय.
या मालिकेत वामिका गब्बी, प्रियांशू पैन्युली, नसीरुद्दीन शाह, नीना गुप्ता, रत्ना पाठक शाह, गुलशन ग्रोव्हर, लारा दत्ता, चंदन रॉय सन्याल आणि पाओली डॅम यांच्यासह प्रतिभाशाली कलाकारांचा समावेश आहे. शोच्या उर्वरित भागांच्या अधिकृत रिलीज तारखेची अद्याप प्रतीक्षा आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर स्ट्रिम केला जाईल.
दिग्दर्शक आणि निर्माते विशाल भारद्वाज यांनी याआधी सांगितले की, 'मी अगॅथा क्रिस्टीच्या सर्व रहस्यमय कथा वाचत मोठा झालोय. तिचे कथानक, पात्रे आणि मांडणी शैलत अतुलनीय आहे आणि आजही कथाकारांना उत्तेजित करत आहे. सहयोग करण्याचा हा एक अविश्वसनीय प्रवास होता. जेम्स प्रिचर्ड, अगॅथा क्रिस्टीचा नातू, ज्यांनी आमच्या टीमला नेहमीच अनोखा दृष्टीकोन दिला. या रोमांचकारी आणि रहस्यमय जगाला अनुकूल करण्यासाठी सोनी लिव्ह आणि प्रिती शहानी हे माझ्यासाठी योग्य भागीदार आहेत.'