मुंबई - Asian Culture Awards and Ramesh Sippy : जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या 20व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'त हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल रमेश सिप्पी यांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे.
दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना पुरस्कार दिला जाणार आहे :प्रकाश मगदुम यांना ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘सत्यजित रे’ पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘शोले’, ‘शान’, ‘सीता और गीता’, ‘सागर’ यासारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रसिकांना उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला असून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. दरम्यान 20 व्या ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ ची नोंदणी 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे.