मुंबई - अनुभव सिन्हा हा आजच्या घडीचा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची नस ओळखलेला यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात त्याने एकाहून एक सरस चित्रपट दिलेत. त्याने निर्माण केलेले आधीचे चित्रपट पाहिले तर हाच का तो दिग्दर्शक असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.
अनुभव सिन्हाचा अलिकडेच भीड हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा एका नव्या क्लासिक सिनेमाची अनुभूती प्रेक्षकांनी घेतली. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जेव्हा आपल्या रुपेरी पडद्यावर दिसायला लागतात आणि त्यातून एका नव्या कथानकातून आपण गुंतून जातो, वास्तवाचे भान मिळते आणि एका समृद्ध अनुभवातून आपण जातो, ही किमया करणारा अनुभव सिन्हा असतो. त्याचे चित्रपट केवळ समीक्षकांनाच नाही तर सामान्य प्रेक्षकांलाही भुरळ घालतात. असा हा प्रतिभावान माणूस आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
अनुभव सिन्हा यांनी स्वत: दिग्दर्शक म्हणून केलेल्या परिवर्तनाची वारंवार कबुली दिली आहे. अनुभवने स्वतः सांगितले होते की, 2001 मध्ये तुम बिन हा चित्रपट बनवताना खूप गाणी असतील, असे सांगण्यात आले होते. या चित्रपटात तब्बल ११ गाणी होती. त्यामुळेच त्याने हा सिनेमा स्वीकारला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बरा चालला पण याला सर्वात जास्ट रेटिंग मिळाले टीव्ही प्रसारणातून. यातील गाणी हिट झाली आणि हा कोण दिग्दर्शक आहे म्हणून निर्मात्यांची त्याच्यावर नजर गेली. त्यानंतर त्याने आपको पहले भी कही देखा है, दस, तथास्तु, कॅश आणि रावण असे चित्रपट बनवले. तुम बिन ते रावण अशी त्याची पहिली यशस्वी इनिंग होती. परंतु हे सर्व चित्रपट व्यावसायिक दृष्टीकोनातून बनवलेले सिनेमा होते. शाहरुख खानसोबतचा रावण हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्यानंतर दिग्दर्शकाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले आणि तिथून बहुधा नवा अनुभव सिन्हा जन्माला आला असावा.
तुम बिन २ या चित्रपटाचा सिक्वेल त्याने २०२६ मध्ये बनवला. यातही भरपूर गाण्यांचा समावेश होता. ही म्यूझिकल लव्ह स्टोरी प्रेक्षकांना आवडली पण अनुभवच्या मनात अजून काही वेगळेच होते. मुळात हा बदल त्यांनी 'आर्टिकल 15' चित्रपटातून सुरू केला होता. एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला की, या चित्रपटाची पटकथा मी रागातूनच लिहायला सुरुवात केली. आणि तो राग त्याला त्याच्या चित्रपटात दाखवायचा होता, त्यामुळे त्याच्यात बदल झाला. 'आर्टिकल 15' चित्रपटात समाजाचे जाती वास्तव आणि शोषणाचे चित्रण करुन त्याने प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.