मुंबई- सिनेरसिकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक चांगल्या शीर्षकाच्या शोधत असतात. चित्रपटाचे नाव प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारे असावे लागते जेणेकरून ते तो चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतील. त्याच अनुषंगाने सद्गुरू एंटरटेनमेंट आणि दीपलक्ष्मी यांची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'दिल मलंगी'. चित्रपटाच्या नावात दिल आहे म्हणजे हा चित्रपट नक्कीच रोमँटिक असणार. तर हा एक रॉमकॉम फँटसी चित्रपट असून यातून एक अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे असे निर्मात्यांनी सांगितले.
दिल मलंगीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे सुनिल परब यांनी. त्यांनी याआधी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केलेले असून 'सून माझी भाग्याची', 'छावणी', 'चंद्री', 'पहिली भेट' या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. लेखक स्वप्निल गांगूर्डे यांनी कथा लिहिली असून त्यांच्यासोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम' अभिनेता प्रथमेश शिवलकर याने पटकथा लेखन केले आहे. प्रथमेश शिवलकर याने संवाद लेखनाची जबाबदारीही पार पाडलीय.
'दिल मलंगी'अधील नायक, सतेज ढाणे पाटील, प्रखर बुद्धिमत्ता असलेला असून सरळमार्गी आहे. तसेच तो स्वप्नाळू असून त्याला प्रेमात पडायची घाई आहे. त्यामुळे कॉलेज मध्ये त्याचे एका मुलीवर प्रेम जडते. दोघेही हिंडू फिरू लागतात आणि तो तिच्यात अधिकच गुंततो. परंतु तो जरी तिच्यावर मनापासून प्रेम करीत असला तरी ती त्याच्यावर तितके प्रेम करीत नाही हे त्याला जाणवते. किंबहुना ती त्याला एक टाईम पासचं साधन समजत असते. हे कळल्यावर त्याला दुःख होते आणि रागदेखील येतो. भावनिकरित्या तुटल्याने त्याचा प्रेमावरील विश्वास उडतो. स्वप्नाळू असलेला सतेज आता प्रॅक्टिकल बनतो आणि पुढे करियर वर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवितो. मुंबईत येऊन तो कठोर मेहनत घेतो आणि आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर 'ग्लोबल ट्रान्स मिडिया' या जाहिरात कंपनीमध्ये काम करीत नाव कमावतो. त्या कंपनीचे मालक हर्षवर्धन मराठे यांचा तो लाडका बनतो. मात्र काही कारणात्सव तो मुंबई सोडण्याचे ठरवितो जे हर्षवर्धन यांना रुचत नाही. पुढे या चित्रपटाची कथा फँटसी रुपात समोर येते.