मुंबई - सध्या महाराष्ट्रात पंढरपूर वारीमुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय चैतन्याने भारुन गेलंय. पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान झालंय. लाखो वारकरी 'विठ्ठल माझा सोबती' म्हणत गजर करताना दिसताहेत. आजवर विठ्ठलावर अनेक चित्रपट बनलेत, काही पौराणिक तर काही पांडुरंगाचा महिमा सांगणारे, त्याचे अध्यात्मिक आणि प्रासंगिक गुणगान करणारे! याच परंपरेतील भक्ती, श्रद्धा आणि विठुरायाचे अस्तित्व दाखवणारा अनुभव प्रधान 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाची निर्मिती फक्त मराठीने नाइन्टी नाइन प्रॉडक्शनच्या सोबतीने केली आहे. २३ जून रोजी महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून देव विठुराया हे भक्तीमय गीतही लॉन्च करण्यात आलंय.
भागवत धर्म हा वेगळा नसून वारकरी तो आपल्या खांद्यावरुन शेकडो वर्षे आपल्या खांद्यावरील पताका प्रमाणे परंपरेने वाहात आलेत. 'पंढरीचा वास, चंद्रभागेत स्नान, आणिक विठोबाचे दर्शन' यासाठी वारकरी आयुष्यभर वारी करत राहतो. वारी चुकवायची नाही अशीच भागवत संप्रदायाची धारणा आहे. सर्व जाती, धर्म, पंथ ही बाजूला ठेवून विठ्ठल माझा सांगाती म्हणत वारकरी दिंडीतून चालत राहतो. पण जर कधी वारी चुकलीच तर काय होते, या विषयावर आधारित 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाचे कथानक आहे.
अरुण नलावडे यात कुटुंब प्रमुख असलेल्या वारकऱ्याची भूमिका साकारत आहेत. काही कारणाने त्यांची वारी चुकते आणि त्यांच्या भेटीसाठी विठ्ठल येतो. त्यांची आस्थेने विचारपूस करतो, समस्या जाणून घेतो आणि त्या लीलया सोडवतोही. यात विठ्ठलाची भूमिका अभिनेता संदिप पाठक करत आहे. चित्रपटात अरुण नलावडे आणि संदिप पाठक शिवाय राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, दिव्या पुगांवकर, अभय राणे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटातील देव विठुराया हे गीत रिलीज झालंय. चंद्रभागेच्या तीरावर जमलेला वारकऱ्यांचा मेळा, खांद्यावरील भगव्या पताका या दृष्यांसह.. 'करकटावरी तुळशी माळ गळा, ऐसे रुप दावी हरी...'असे पार्श्वगीत सुरू होते आणि'कटी पितांबर, कास मिरवली ठेविले चरण विठेवरी'बोल ऐकू येऊ लागतात. वारीची विस्तिर्ण दृष्ये, टाळ मृदंगाचा गजरात...'मन मंदिरात देवा तुझा ध्यास, भक्तीचा हा ठेवा, आला बा भरास...दाही दिशा चराचरी, याची कृपा छाया, माझा सावळा देव विठुराया'हे विठ्ठल गीत सुरू होते. शशांक कोंडविलकर यांनी लिहिलेल्या देव विठुराया या गाण्याला गणेश सुर्वे यांनी संगीतबद्द केलंय आणि गौरव चाटी यांनी स्वरसाज चढवला आहे.