मुंबई - Dev Anand 100th birth anniversary:हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या व्यक्तीमत्वाची अमिट छाप सोडलेली काही अशी नावं आहे जी कधीही विस्मरणात जाणार नाहीत, त्यापैकीच एक आहेत देव आनंद. त्यांची आज १०० वी जयंती साजरी होत आहे. रुपेरी पडद्यावरचा सदाबहार रोमँटिक नायक आणि कालातीत स्टाईलचे प्रतिक असलेल्या देव आनंद यांचा आज जन्मदिवस आहे.
देव आनंद यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास 1940 च्या दशकात सुरू झाला. गुरदासपूर, पंजाब येथे जन्मलेल्या देव यांच्याकडे अभिनय क्षमता, विनम्रता आणि एक जादुई करिष्मा यांचं अनोखं मिश्रण होतं. त्यामुळे ते त्यांच्या समकालीन अभिनेत्यांहून वेगळं ठरतात. स्वतःला कॅरी करण्याची पद्धत, कपड्यांची स्टाईल आणि हास्य यामुळे देव आनंद यांनी आपल्या चाहत्यांना वेड लावलं होतं.
देव आनंद यांनी स्वतःची अशी एक सिग्नेचर स्टाईल निर्माण केली होती. स्कार्फ किंवा स्टायलिश टोपी घालून थोडेसे तिरकं डोकं करुन केलेलं हास्य मोहून टाकणारं असायचं. देव आनंद यांनी सहजतेने 50 च्या दशकातील डेबोनेअर लुकपासून 70 च्या दशकातील ट्रेंडसेटिंग लाँग साइडबर्न आणि कॉलर शर्टमध्ये स्वतःच्या स्टाईलमध्ये बदल केला. देव आनंद यांच्यात एक अंगभूत स्वॅग होता. लोकांना चुंबका प्रमाणे स्वतःकडे खेचण्याची त्यांच्याकडे कला होती. केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही ते महत्त्वाकांक्षी नायकाचं व्यक्तिमत्त्व जगत होते.
अभिनेता म्हणून देव आनंद यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वातील आणखी एक पैलू म्हणजे आदर्शवादी तरुण आणि अत्याधुनिक गृहस्थांच्या भूमिकेत त्यांनी उत्कट नाट्य आणि रोमान्सने वातावरण बदलून टाकलं. वेळ आणि भाषेचे अडथळे ओलांडून आपल्या प्रेक्षकांशी भावनिकरित्या जोडून घेण्याची अद्वितीय क्षमता देव आनंद यांच्याकडे होती.
देव आनंद अभिनेत्याच्या पलीकडे जाऊन एक दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता होते. नाविन्यपूर्ण कथाकथन आणि सिनेमॅटिक तंत्रात प्रयोग करण्याच्या तयारीसाठी ते ओळखले जात असत. गाईड या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती आणि वहिदा रहमानसोबत अप्रतिम भूमिकाही साकारली होती. हा त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्तम पुरावा आहे आणि तो कायमस्वरुपी क्लासिक आहे.