नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसंदर्भात दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी तपासाचा संपूर्ण तपशील जाहीर केला आहे. अतिरिक्त डीसीपी राजीव कुमार यांनी सांगितले की, सतीश कौशिक होळीच्या दिवशी सकाळी 10 वाजता व्यवस्थापक संतोष रॉय यांच्यासोबत दिल्लीत आले होते. यानंतर ते कापशेरामधील बिजवासन येथील त्यांचा मित्र विकास मालू याच्या पुष्पांजली फार्म हाऊसवर गेले होते. तेथे त्यांनी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होळीचा सण साजरा केला.
श्वास घेण्यास अडथळा : होळीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. दुपारी होळी साजरी केल्यानंतर विश्रांतीसाठी ते गेले. त्यानंतर संध्याकाळी आणि रात्री कोणत्याही पार्टीत ते सहभागी झाले नाही. रात्री ९ वाजता त्यांनी जेवण केले आणि नंतर फेरफटा मारला. झोपण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या आयपॅडवर चित्रपट पाहिला, मग ते झोपले. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. ते त्यांनी संतोष रॉयला सांगितले. यावर त्यांना तात्काळ फोर्टीज रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.