मुंबई - Deepika Padukone Fighter :अभिनेता हृतिक रोशनचा मोस्ट अवेटेड 'फायटर' चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. 'फायटर' निर्मात्यांनी हृतिक रोशनचा जबरदस्त फर्स्ट लूक शेअर केल्यानंतर आता दीपिका पदुकोणची पहिली झलक रिलीज केली आहे. दीपिका पहिल्यांदा पायलट लूकमध्ये रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तिचा फर्स्ट लूक चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दीपिकाच्या फर्स्ट लूकची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. शाहरुख खानसोबत अॅक्शन मोडमध्ये दिसलेली दीपिका पुन्हा एकदा वेगळ्या अवतारात पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे.
'फायटर'मधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक : दीपिका पायलटच्या भूमिकेत खूप खास दिसत आहे. खाकी पोशाखात चष्मा घातलेली दीपिकाचा इंटेन्स लूकनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 'फायटर' चित्रपटात, ती स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारणार आहे असून तिचं टोपणनाव मिनी असणार आहे. दीपिका ही हृतिकसोबत एअर ड्रॅगन युनिटमध्ये असेल. या चित्रपटामधील हृतिकचं फर्स्ट लूक पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. 'फायटर'चं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. या बिग बजेट चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.