मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' यावर्षी 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि आता या चित्रपटातील पहिले गाणे 'केसरिया' रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणेही चाहत्यांना आवडले आहे. यासोबतच चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर येत आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनेही 'ब्रह्मास्त्र 2' वर काम सुरू केले आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे दीपिका पदुकोणची भूमिका या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात असणार आहे.
मीडियानुसार, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात महादेव आणि पार्वती ही दोन नवीन पात्रं दिसणार आहेत. आता दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पार्वतीच्या भूमिकेसाठी तिला अप्रोच करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागातही दीपिका पदुकोणचा दमदार कॅमिओ असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटातील महादेवच्या भूमिकेसाठी तयारी सुरू असून त्यासाठी चांगल्या आणि सशक्त अभिनेत्याचा शोध सुरू आहे.