मुंबई- प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. या चित्रपटात यांच्या शिवाय अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सॅन दिएगो कॉमिक कॉनमध्ये भव्य मंचावरुन पहिल्या ट्रेलर लॉन्चची योजना केली आहे. या नेत्रदीपक सोहळ्याल दीपिका पदुकोण मात्र मुकणार आहे.
दीपिका पदुकोण या सोहळ्यात भाग घेणार नसल्याचे कारण खूप वेगळे आहे. सध्या अमेरिकेमध्ये हॉलिवूड लेखक युनियनचा संप सुरू आहे. त्यामुळे येथील चित्रपट आणि टीव्ही शो निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. या युनियनची दीपिकाही सदस्य आहे. संघटनेने सर्व कलाकारांवर अशा प्रकारच्या प्रमोशन्सला हजर न राण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दीपिका याचे पालन करत असून सॅन दिएगोतील 'प्रोजेक्ट के' इव्हेन्टला ती गैरहजर राहणार आहे.
स्टुडिओ आणि स्ट्रीमर्सच्या विरोधात लेखकाच्या संपाची घोषणा SAG-AFTRA च्या वतीने जुलै महिन्याच्या १४ तारखेला करण्यात आली होती. या संघटनेमध्ये कलाकार, लेखक, तंत्रज्ञ यांच्यासह १ लाख ६० हजार कलाकारांचा संपाला पाठिंबा आहे. या संघटनेचे सदस्य चित्रपटाचे प्रमोशन, प्रीमियर आणि पुरस्कार वितरण सोहळे संप सुरू असे पर्यंत भाग घेऊ शकणार नाहीत.
अमेरिकेतील सॅन दिएगो येथील 'प्रोजेक्ट के' कार्यक्रमात चित्रपटाचे शीर्षक व पहिला ट्रेलर लॉन्च केला जाणार आहे. वैजयंती मुव्हिजने हा भव्य लॉन्चिंग सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला हजर राहण्यासाठी यापूर्वीच प्रभास आणि राणा दग्गुबाती सॅन दिएगोला पोहोचले आहेत. आजच साऊथ स्टार कमल हासनदेखील अमेरिकेत दाखल झाला. या सोहळ्याचे जोरदार प्रमोशन सुरू असून न्यॉर्कमधील प्रतिष्ठीत टाईम्स स्वेअरमध्ये बिल बोर्डवर याची जाहिरात सुरू आहे. दरम्यान प्रभासच्या अमेरिकेतील फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सेंट लुइस येथे प्रभास फॅन्सनी एका कार रॅलीचे आयोजन केले होते. 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या लॉन्चिंग सोहळ्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे.